खलिस्तानवादी स्वयंघोषित शीख धर्मोपदेशक अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांनी शनिवारी नाट्यमयरित्या अटक केली होती. त्याला नकोदर येथून ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान, या कारवाईविरोधात ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर खलिस्तानी समर्थकांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी खलिस्तानी समर्थकांनी भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केला. तसेच अमृतपाल सिंगच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा – खलिस्तानवाद्यांची धरपकड, अमृतपालच्या ठावठिकाण्याबाबत गूढ; ७८ समर्थक ताब्यात
खलिस्तानी समर्थकांकडून तिरंग्याचा अपमान
या व्हिडीओमध्ये काही खलिस्तानी समर्थक ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करताना दिसत आहेत. तसेच अमृतपाल सिंगच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजीदेखील त्यांच्याकडून करण्यात येत आहे. यावेळी काही समर्थकांनी उच्चायुक्त कार्यालयावरील भारतीय राष्ट्रध्वज खाली उतरवून तिरंग्याचा अपमान केला आहे.
भारत सरकारने व्यक्त केली तीव्र नाराजी
दरम्यान, या घटनेनंतर भारत सरकारने नाराजी व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रायलयाने ब्रिटनच्या भारतातील उच्चायुक्तांना बोलावून तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच ही घटना घडली तेव्हा ब्रिटीश सुरक्षा अधिकारी या ठिकाणी उपस्थित का नव्हते. आंदोलनकर्त्यांना उच्चायुक्तालयाच्या परिसरात प्रवेश का देण्यात आला? यासंदर्भातील स्पष्टीकरणही भारत सरकारने मागितले आहे.
हेही वाचा – पुतिन यांची युक्रेनला अचानक भेट
ब्रिटिश उच्चायुक्तांकडूनही घटनेचा निषेध
दरम्यान, भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी या घटनेचा निषेध केला आहे. “भारतीय उच्चायुक्तालय परिसरात घडलेली घटना निषेधार्ह आहे. मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो. हे पूर्णपणे चुकीचं आणि अमान्य आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्वीटद्वारे दिली.