खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंडा याचा पाकिस्तानात मृत्यू झाल्याची माहिती पंजाब पोलिसांमधील सूत्रांनी दिली आहे. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये रिंडा सामील होता. रिंडाची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या केल्याचा दावा दविंदर भांबिहा या गुन्हेगारी टोळीने सोशल मीडियावर केला आहे. मे महिन्यात पंजाब पोलीस गुप्तचर मुख्यालयावर ‘रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड’ (आरपीजी) हल्ला आणि लुधियाना न्यायालयात झालेल्या स्फोटात हरविंदर सिंह रिंडा हा मुख्य सूत्रधार होता.
प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातही रिंडाचे नाव समोर आले होते. ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ या बंदी घातलेल्या खलिस्तानी संघटनेचा तो सदस्य होता. दरम्यान, किडनी निकामी झाल्याने रिंडा लाहोरच्या एका रुग्णालयात १५ दिवसांपासून भरती होता. याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) रिंडावर १० लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते.
कोण होता हरविंदर सिंग रिंडा?
रिंडा हा गुन्हेगार आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी गटांचा मुख्य दुवा होता. ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांच्या सीमेपलीकडील तस्करीतही त्याचा सहभाग होता. मे महिन्यात हरियाणामध्ये एका वाहनातून शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त केल्याच्या प्रकरणातही त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. गेल्या नोव्हेंबरमध्ये नवांशहर येथील गुन्हे अन्वेषण संस्थेच्या कार्यालयात झालेल्या हँड ग्रेनेड हल्ल्यातही त्याचा सहभाग आढळून आला होता. रिंडा पंजाबमधील मोस्ट वॉन्टेड ‘ए’ प्लस श्रेणीचा गुन्हेगार होता. महाराष्ट्र, चंदीगड, हरियाणा आणि पश्चिम बंगालसह इतर ठिकाणांच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा शोध तपास यंत्रणांकडून घेतला जात होता. रिंडाने २००८ मध्ये गुन्हेगारी जगतात प्रवेश केला. चंदीगडमधील होशियारपूरचे सरपंच सतनाम सिंग यांच्या हत्येत त्याचा सहभाग होता. खून, विनयभंग आणि खंडणी असे जवळपास ३० गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.