अभिनेत्री कंगना रणौतच्या इमर्जन्सी या चित्रपटाविरोधात लंडनमध्ये मास्क घातलेल्या खलिस्तान्यांनी आंदोलन केलं. हॅरो व्होय सिनेमागृहाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आलं. विदेशातील भारतीय या चित्रपटगृहात इमर्जन्सी हा चित्रपट पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी चेहरे झाकलेल्या खलिस्तानी आंदोलकांनी आंदोलन करत घोषणा दिल्या. तसंच सिनेमाचं स्क्रिनिंग थांबवण्याची मागणी या आंदोलकांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलोनी बीलेड या ब्रिटिश भारतीय महिलेने काय सांगितलं ?

सलोनी बीलेड ही ब्रिटिश भारतीय महिला तिच्या मित्रांसह कंगनाचा इमर्जन्सी हा सिनेमा पाहण्यासाठी गेली होती. सिनेमा सुरु झाल्यानंतर ४० मिनिटांनीच आंदोलन सुरु झालं असं तिने सांगितलं. तसंच त्यांनी डाऊन इंडियाच्या घोषणा दिल्या आणि शिखांचं शिरकाण कसं झालं? याबाबत ते ओरडू लागले असं सलोनीने सांगितलं. त्यांच्या हातात शिखांचं शिरकाण कसं झालं ते सांगणारी पत्रकं होती. त्यांनी तिकिट वगैरे न काढताच सिनेमागृहात प्रवेश केला आणि घोषणाबाजी केली. त्यांनी चित्रपटगृहाबाहेर असलेल्या स्टाफला धक्काबुक्की केली आणि त्यानंतर सिनेमा हॉलमध्ये प्रवेश केला आणि चित्रपट बंद करण्याची मागणी केली. सलोनीने सांगितलं की जे काही घडलं ते धक्कादायक होतं. सिनेमा हॉलमध्ये आलेल्या ९५ टक्के लोकांनी या आंदोलकांनी बाहेर काढलं.

१० मिनिटांत पोलीस घटनास्थळी आले, पण शो पुढे झाला नाही

ही घटना घडल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत पोलीस या ठिकाणी आले. मात्र पोलिसांनी खलिस्तानी आंदोलकांपैकी कुणालाही अटक केली नाही. पोलिसांनी आम्हाला सांगितलं की जे आंदोलन खलिस्तानी करत आहेत त्यांचा तो अधिकार आहे. त्यां आंदोलकांनी आम्हाला कुठलीही इजा पोहचवली नाही. हे आंदोलक निघून गेल्यानंतर सिनेमा दाखवण्यात येईल का अशी विचारणा सलोनी आणि तिच्या मित्रांनी केली. मात्र हा शो रद्द करण्यात आल्याचं त्याने सांगितलं.

आम्ही सगळे घाबरुन गेलो होतो असंही ब्रिटिश महिलेने सांगितलं

अचानक घडलेल्या या घटनेने मी आणि माझ्याबरोबरचे माझे मित्र सगळेच घाबरुन गेलो होतो. कारण आमची सुरक्षा कऱण्यासाठी आजूबाजूला कुणीही नव्हतं. तर आंदोलकांकडे कृपाण होत्या. एखादा सिनेमा पाहण्यासाठी आपण जातो आणि असा अनुभव येतो हे धक्कादायक होतं. मास्क घातलेली माणसं घोषणाबाजी करत होती. त्यांचा हेतू काय होता ते आम्हाला कळलं नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

रश्मी चौबे यांनी याबाबत नेमकं काय सांगितलं?

या चित्रपटाचा शो पाहण्यासाठी रश्मी चौबे ही भारतीय स्त्रीही तिच्या मुलांसह आणि मैत्रिणींसह गेली होती. ती म्हणाली आम्हीही चेहरा झाकलेल्या आंदोलकांना पाहिलं. काय घडतंय हे कळायच्या आतच त्यांच्या घोषणा सुरु झाल्या. अंधार असल्याने आधी नीट दिसलं नाही. मात्र लक्षात आलं की सिनेमा हॉलमध्ये ते अनेक ठिकाणी आहेत. त्यामुळे भीतीने आमची गाळण उडाली. त्यांच्यापैकी काही लोक हे स्क्रिनच्या समोर आले आणि त्यांनी खलिस्तानच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी या सगळ्यांना बाहेर काढल्यानंतर सिनेमा पुन्हा सुरु करा अशी मागणी मी आणि माझ्या मैत्रिणींसह काही प्रेक्षकांनी केली. मात्र हा सुरक्षेचा प्रश्न आहे असं सांगून हा शो रद्द करण्यात आला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khalistanis strom emergency movie show in uk cops say they have right to protest scj