पीटीआय, टोरांटो,

नवी दिल्ली : प्रतिबंधित खलिस्तान टायगर फोर्सचा (केटीएफ) नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडादरम्यानच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. निज्जरची हत्या जून महिन्यात कॅनडातील सरे येथे झाली होती.

निज्जरच्या हत्येमागे भारत सरकारच्या एजंटचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टड्रो यांनी पार्लटमेंटमध्ये केला. मात्र, हे आरोप ‘निर्थक आणि कोणाची तरी फूस असलेले’ आहेत अशी टीका भारताने केली. देशाचे हित सर्वात महत्त्वाचे असल्याचे सांगून विरोधी पक्ष काँग्रेसने सरकारच्या पाठीशी असल्याचे संकेत दिले.

गेल्या काही आठवडय़ांमध्ये कॅनडाच्या सुरक्षा संस्थांनी केलेल्या तपासावरून हरदीप सिंग निज्जर या कॅनडाच्या नागरिकाच्या हत्येत भारत सरकारच्या एजंटचा हात होता का, याचा तपास करत आहोत, अशी माहिती ट्रुडो यांनी पार्लमेंटच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये दिली. ट्रुडो यांच्या निवेदनानंतर, कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलनी जोली यांनी एका वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीचे आदेश दिल्याचे सांगितले. जोली यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार ‘रिसर्च अँड अॅनालिसिस िवगचे (रॉ) प्रमुख पवन कुमार राय यांच्या हकालपट्टीचे आदेश देण्यात आले. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी ट्रुडो यांचे आरोप ‘निर्थक आणि कोणाची तरी फूस असलेले’ आहेत असे म्हणत फेटाळले तसेच जोली यांच्या वक्तव्यावरही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. कॅनडाचे भारतातील उच्चायुक्त कॅमेरून मॅके यांना बोलावून घेऊन पुढील पाच दिवसांमध्ये देश सोडण्याचे आदेश दिले. ट्रुडो यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडेही हेच आरोप केले होते आणि ते पूर्णपणे फेटाळण्यात आले होते असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>“भारत चंद्रावर पोहोचला आणि पाकिस्तान जगाकडे पैशांची भीक मागतोय”, नवाझ शरीफ यांचं विधान

निज्जर कोण होता?

४५ वर्षीय हरदीप सिंग निज्जर हा प्रतिबंधित केटीएफचा (खलिस्तान टायगर फोर्स) प्रमुख होता आणि भारताकडून सर्वाधिक शोध घेतल्या जाणाऱ्या दहशतवाद्यांपैकीच एक होता. त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस होते. पश्चिम कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतामधील सरे येथील गुरुद्वारात १८ जून रोजी दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता.

ट्रुडो यांची अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनबरोबर चर्चा

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ट्रुडो यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह मित्रदेशांच्या राष्ट्रप्रमुखांना यासंबंधी माहिती दिली. या आरोपांबद्दल आपल्याला चिंता वाटते, अशी प्रतिक्रिया व्हाइट हाऊसतर्फे व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा >>>“नेमकं काय रिकामं आहे? नरेंद्र मोदींचं डोकं की…”, अभिनेते प्रकाश राज यांनी उडवली खिल्ली

अशा निराधार आरोपांद्वारे खलिस्तानी दहशतवादी आणि अतिरेकी यांच्यावरचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांना कॅनडाने आश्रय दिला आहे आणि ते भारताचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी धोकादायक आहेत. या प्रकरणी कॅनडा सरकारची दीर्घकाळापासून असलेली निष्क्रियता चिंताजनक आहे. – परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार

कॅनडाच्या नागरिकाच्या हत्येमध्ये परदेशी सरकारचा कोणत्याही प्रकारचा सहभाग हा आमच्या सार्वभौमत्वाचे अस्वीकार्य उल्लंघन आहे. आम्ही या प्रकरणात भारत सरकारला कॅनडाबरोबर सहकार्य करण्याची विनंती केली होती.- जस्टिन ट्रुडो, पंतप्रधान, कॅनडा