काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे ‘इंडिया’ आघाडीत मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना संयोजकपदी नियुक्त करण्यात आलं होतं. पण, ‘इंडिया’ आघाडीतील सर्व पक्षांची सहमती असेल, तरच संयोजक पद स्विकारू, असं नितीश कुमारांनी सांगितल्याची माहिती ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सूत्रांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात ‘इंडिया’ आघाडीची दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक पार पडली. या बैठकीला ‘इंडिया’ आघाडीतील १४ पक्ष सहभागी झाले होते. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बैठकीला उपस्थित राहिल्या नाहीत.
नितीश कुमार यांना संयोजक म्हणून नियुक्त करण्यासाठी जनता दलाकडून (संयुक्त) दबाव टाकण्यात येत होता. तर, यास तृणमूल काँग्रेसकडून विरोध करण्यात येत होता. ‘इंडिया’ आघाडीच्या मागील बैठकीत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपद आणि संयोजकपदासाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता.
“एखाद्याच्या चेहऱ्यावर मते मागावी, असं अजिबात वाटत नाही”
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘इंडिया’ आघाडीतील पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबाबत भाष्य केलं आहे. “कुणाचाही चेहरा समोर ठेवून मते मागावी, असं अजिबात वाटत नाही. कारण, लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यावर आम्ही निश्चितच देशाला चांगला पर्याय देऊ,” असं शरद पवारांनी सांगितलं.