पीटीआय, खार्तुम : Sudan Conflict सुदानची राजधानी खार्तुम येथे बंडखोर निमलष्करी दले (आरएसएफ) आणि सुदानचे सैन्य यांच्यादरम्यानचा संघर्ष सोमवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. यामध्ये मोठय़ा प्रमाणात सामान्य नागरिकांचा बळी जात असून आतापर्यंत या संघर्षांत मरण पावलेल्या नागरिकांची संख्या ९७ इतकी झाली आहे, तसेच शेकडोजण जखमी झाले आहेत. काही चित्रफितींमध्ये गणवेशातील अनेक सैनिक मृतावस्थेत दिसले आहेत, पण त्याविषयी अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान, अमेरिकेसह इतर देशांनी शांततेचे आवाहन केले आहे.
दरम्यान, सुदानमधील संघर्ष अजूनही निवळत नसल्यामुळे स्थानिक भारतीयांनी खबरदारी घ्यावी, घराच्या बाहेर पडू नये तसेच शांत राहावे असा सल्ला भारतीय दूतावासाने दिला आहे. अधिकृत माहितीनुसार सुदानमधील भारतीयांची संख्या साधारण चार हजार इतकी आहे. यापैकी १,२०० जण अनेक वर्षांपासून तिथे स्थायिक झाले आहेत. रविवारी गोळीबारात मृत्यू झालेल्या केरळी व्यक्तीच्या कुटुंबाला सर्व ती मदत केली जाईल असे केंद्र सरकारने सांगितले.
सत्तेसाठी सहकार्य आणि संघर्ष
सुदानचे सैन्यप्रमुख जनरल अब्देल-फताह बुऱ्हान आणि आरएसएफचे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान दागालो हे दोघेही पूर्वाश्रमीचे सहकारी आहेत. सुदानमध्ये ऑक्टोबर २०२१ मध्ये दोघांनी एकत्रितपणे लष्करी बंडाद्वारे तेथील अल्पकालीन लोकशाही उलथवून सत्ता ताब्यात घेतली होती. मात्र, आरएसएफच्या सैन्यामध्ये विलीनीकरण करण्याच्या मुद्दय़ावरून हा संघर्ष सुरू झाला आहे. आपण वाटाघाटी करायला तयार नाही असे दोघांनीही स्पष्ट केले आहे. त्याऐवजी ते एकमेकांना शरण येण्याची मागणी करत आहेत.