केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार यांना नपुंसक म्हटल्याने नवा वाद उद्भवला आहे. तथापि, आपण केलेले वक्तव्य गुजरातमध्ये २००२ मध्ये उसळलेल्या दंगलीच्या संदर्भातील असून त्यासाठी अन्य कोणताही चपखल शब्द नाही, असे स्पष्ट करून खुर्शीद आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले आहेत.
गुजरातमधील दंगल मोदी यांनी ज्या पद्धतीने हाताळली ते पाहता आपला राग व्यक्त करण्यासाठी नपुंसक याऐवजी अन्य कोणताही शब्द योग्य नाही. त्यामुळे आता मोदी यांनी दंगलींबाबत सत्य कबूल करावे, असेही खुर्शीद यांनी म्हटले आहे.
आपण डॉक्टर नाही, आपण त्यांची शारीरिक तपासणी करू शकत नाही, त्यामुळे त्यांची शारीरिक स्थिती कशी आहे त्याबाबत आपल्याला काही देणेघेणे नाही. एखादी व्यक्ती ठोस पावले उचलण्यास सक्षम नाही हे दर्शविण्यासाठी राजकीय शब्दकोशात नपुंसक हा शब्द असून त्याच अर्थाने आपण या शब्दाचा वापर केला आहे, असेही खुर्शीद म्हणाले.भाजपने  फटकारले
काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाच्या नेत्यांना शिष्टाचाराचे विस्मरण झाले असून पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना अशा प्रकारची शेरेबाजी मान्य आहे का, असा सवालही भाजपने केला आहे. जी व्यक्ती देशाचे परराष्ट्रमंत्री आहेत त्यांच्या तोंडून अशी भाषा येणे अशोभनीय आहे, असे भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या नेत्यांनी संयम पाळावा, असे भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे.

Story img Loader