मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली आणि त्याचा साथीदार तहव्वूर राणा यांना भारताच्या स्वाधीन करावे, अशी विनंती करणारे पत्र परराष्ट्र व्यवहारमंत्री सलमान खुर्शिद यांनी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिण्टन यांना पाठविले आहे.
जानेवारी महिन्यात सदर दोघांना शिक्षा सुनावली जाणार असून त्यापूर्वी त्यांना भारताच्या स्वाधीन करावे, असे खुर्शिद यांनी पत्रात म्हटले आहे. अमेरिका भारताच्या विनंतीवर सकारात्मक निर्णय घेईल, अशी भारताला अपेक्षा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र अमेरिकेकडून अद्याप त्याबाबत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
अमेरिकेच्या राजकीय व्यवहारमंत्री वेण्डी शेरमन या गेल्या महिन्यांत भारतभेटीवर आल्या होत्या. हेडली याला भारताच्या स्वाधीन करावे, ही भारताची विनंती विचाराधीन असून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
लष्कर-ए-तय्यबासाठी मुंबईत रेकी करणाऱ्या हेडलीची काही प्रमाणात चौकशी करण्यात आली असली तरी त्याचा साथीदार तहव्वूर राणा याची चौकशी भारतीय अधिकाऱ्यांना अद्यापही करता आलेली नाही.

Story img Loader