राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांचं मोदी आडनावासंदर्भात केलेलं एक जुनं ट्वीट प्रचंड व्हायरल होत आहे. काँग्रेसने यावरून भाजपावर लक्ष केलं असून राहुल गांधींप्रमाणेच आता खुशबू सुंदर यांच्यावरही कारवाई होणार का? असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, यासदंर्भात स्वत: खुशबू सुंदर यांनी प्रतिक्रिया दिली असून मी ते ट्वीट डिलीट करणार नाही, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा – “स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत, त्यांचा अपमान…”, उद्धव ठाकरेंचा थेट राहुल गांधींना इशारा
काय म्हणाल्या खुशबू सुंदर?
मी पंतप्रधान मोदींसंदर्भात केलेलं ट्वीट डिलीट करणार नाही. असे आणखी बरेच ट्वीट मी केले होते. मुळात काँग्रेसकडे आता काहीही कामं उरलेली नाहीत. काँग्रेस पक्षाने त्यांचा वेळ आता चांगल्या कामासाठी वापरावा. खरं तर काँग्रेस मला राहुल गांधींना सारखंच समजतात. त्यासाठी काँग्रेसचे आभार, अशी प्रतिक्रिया खुशबू सुंदर यांनी दिली. तसेच माझी पंतप्रधान मोदींबद्दल मतपरिवर्तन झाल्यानेच मी भाजपात प्रवेश केला होता, असेही त्या म्हणाल्या.
खुशबू सुंदर यांचं ट्वीट नक्की काय होतं?
खुशबू सुंदर यांनी २०१८ मध्ये काँग्रेस पक्षात असताना पंतप्रधान मोदी यांच्या आडनावावरून टीका केली होती. इथे मोदी, तिथे मोदी, जिकडे बघावं तिकडे मोदी, पण मोदी म्हणजे नेमकं काय? प्रत्येक मोदी नावाच्या पूर्वी भ्रष्टाचार शब्द लिहिला जातो. मोदी म्हणजेच भ्रष्टाचार, असे ट्वीट खुशबू सुंदर यांनी केले होते.
दिग्विजय सिंगांनी केली होती टीका
दरम्यान, खुशबू सुंदर यांच्या व्हायरल ट्वीटरून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष केलं होतं. पंतप्रधान मोदी आता आपल्या मोदी नावाच्या शिष्याद्वारे खुशबू सुंदर यांच्यावर मानहानीचा दाखल करतील का? असा प्रश्न त्यांनी विचारला होता.