पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत माजी पंतप्रधान राजा परवेझ अशरफ यांच्यासह अनेकांना पराभवाचा सामना करावा लागला. ऐतिहासिक अशा या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात मतदान झाले होते. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अशरफ यांना ‘रावळपिंडी २’ येथे मानहानिकारक पराभवाचा सामना करावा लागला, असे जिओ न्यूजने म्हटले आहे. पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाचा प्रमुख माजी क्रिकेटपटू इमरान खान हा मियॉवली, पेशावर व रावळपिंडीतून निवडून आला असला, तरी लाहोरमध्ये पराभव झाल्याने त्यांना चौकार साधता आला नाही.
पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ गटाचे राजा महंमद जावेद इखलास यांनी रावळिपडी-२ मतदारसंघात विजय मिळवला आहे. सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या अनेक नेत्यांना धूळ चारण्यात विरोधकांना यश आले. त्यात माजी माहिती मंत्री कमर झमान कायरा, फिरदौस आशिक अवान, पंजाबचे पाकिस्तान पीपल्स पार्टी अध्यक्ष मंझूर अहमद वट्टू, लोकलेखा समितीचे माजी अध्यक्ष नदीम अफजल गोंडाल, बॅरिस्टर चौधरी ऐतझाझ अहसान यांच्या पत्नी बुशरा ऐतझाझ यांचा पराभव झाला. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते व माजी मंत्री नझर महंमद गोंडाल व तस्लीम कुरेशी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
माजी पंतप्रधान गिलानी यांचे दोन पुत्र अली मुसा गिलानी व अब्दुल कादीर गिलानी यांचा मुलतान मतदारसंघात पराभव झाला. अब्दुल याला तर तालिबानी नेत्यांनी प्रचार करीत असताना पळवून नेले होते.
अवामी नॅशनल पार्टीचे प्रमुख असफांदयार वली खान यांचा छरदासा एनए ७ मतदारसंघात जमियत उलेमा ए इस्लाम फजलचे उमेदवार मौलाना एम गोहर शहा यांनी ५३४९२ मतांनी पराभव केला.