Jaipur Kidnapping Case: मागच्या १४ महिन्यांपासून जयपूर पोलीस लहान मुलाच्या अपहरणाच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी दिवसरात्र राबत होते. अखेर अथक परिश्रम केल्यानंतर २५ महिन्यांच्या लहान मुलाला अपहरणकर्त्याच्या तावडीतून सोडून आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. १४ महिने हा चिमुकला अपहरणकर्त्याकडे होता. या काळात दोघांनाही एकमेकांचा लळा लागला. दोघांची फाटाफूट होताना मुलाने फोडलेला टाहो आणि अपहरणकर्त्याचे अश्रू पाहून अनेकांना हा व्हिडीओ भावनिक करणारा वाटला. पण या प्रकरणात आता पोलिसांनी अपहरणकर्त्याची चौकशी केली असून त्याने अनेक खुलासे केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण वेगळ्या दिशेला गेले आहे.
जून २०२३ मध्ये ११ महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात नोंदविली गेली. अपहरणकर्ता हा आमचा नातेवाईकच असल्याचे चिमुकल्याच्या आईने पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी १४ महिने अपहरणकर्ता तनुज चहरचा माग काढला अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. तनुज चहर हा उत्तर प्रदेशच्या अलिगढ राखीव पोलीस दलात वरीष्ठ शिपाई म्हणून कार्यरत होता. मात्र चिमुकल्याच्या आईच्या प्रेमात त्याला नोकरी गमवावी लागली होती, असा दावा त्याने केला आहे.
हे वाचा >> Video: चिमुकल्याला लागला अपहरणकर्त्याचा लळा, आई-वडिलांकडेही जाईना; पोलिसांनी सोडवताच रडू लागला!
आपणच मुलाचे बाप असल्याचा दावा
चिमुकल्याला पालकांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांनी अपहरणकर्ता तनुजची कसून चौकशी सुरू केली. यावेळी त्याने आपणच मुलाचे जैविक बाप असल्याचे सांगितले. त्यामुळेच त्याने चिमुकल्याच्या आईला त्याच्याबरोबर राहण्याची विनंती केली होती. मात्र तिने ही मागणी मान्य केली नाही. सदर महिला आणि अपहरणकर्ता एकमेकांचे नातेवाईक आहेत. आरोपी तनुजला चिमुकल्याच्या आईबरोबर राहायचे होते. मात्र ते शक्य झाले नाही. हे प्रकरण खाप पंचायतीतही पोहोचले होते.
आरोपी तनुज चहरने तोच बाप असल्याचा दावा केल्यानंतर मुलगा आणि आपली डीएनए चाचणी करावी, असेही पोलिसांना सांगितले आहे. मुलाच्या आईने एकत्र राहण्यास नकार दिल्यानंतर आपण नाईलाजाने जून २०२३ रोजी मुलाचे अपहरण केले, असेही तो म्हणाला. पोलीस या प्रकरणाची आणखी तपासणी करत आहेत. अद्याप चिमुकल्याच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया किंवा त्यांची भूमिका समोर आलेली नाही.