दहीहंडी उत्सवात १८ वर्षांखालील मुलांना सक्रिय सहभागी होण्यास मनाई करणारा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगित केला. मात्र, १२ वर्षांखालील मुलांना दहीहंडीत सहभागी करण्यास मनाई केली आहे.
व्यापारीकरण महत्त्वाचे की गोविंदांचा जीव?
‘त्यांच्या सुरक्षेसाठी लढा सुरूच’
मुंबई-ठाण्यात पथकांचा जल्लोष
गोविंदा मंडळांच्या पाठीशी भाजप
दहीहंडीच्या थरांची उंची २० फुटांपेक्षा जास्त नसावी आणि १८ वर्षांखालील मुलांना त्यात सहभागी करून घेऊ नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ११ ऑगस्टला दिला होता. त्यामुळे मुंबई-ठाणे परिसरातील दहीहंडय़ांचे आयोजक हवालदिल झाले होते. त्यांनी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या आव्हान याचिकेच्या सुनावणीत सरन्यायाधीश आर. एम. लोढा, न्या. कुरियन जोसेफ आणि न्या. आर. एफ. नरिमन यांच्या खंडपीठाने ही स्थगिती दिली. तसेच या याचिकेसंबंधात महाराष्ट्र सरकार आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांना आठ आठवडय़ांत बाजू मांडण्यास सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाने दहीहंडी आयोजकांसाठी आखून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे तसेच सुरक्षिततेबाबतचे आदेश यांचे मात्र काटेकोर पालन केले जाईल, याची स्थानिक प्रशासनानेही खातरजमा करावी, असा आदेशही न्यायालयाने दिला.
मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात दहीहंडी आयोजकांना अनेक नियम लागू केले होते. जखमी गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदत दिली जाईल, त्यांच्यावर तातडीने प्रथमोपचार केले जातील आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले जाईल, दहीहंडीच्या ठिकाणी अ‍ॅम्ब्युलन्स असेल, अशी हमी देण्याचे बंधन आयोजकांवर न्यायालयाने घातले होते. आयोजकांनी सहभागी गोविंदांना हेल्मेट, सुरक्षा कडी द्यावीत तसेच थराभोवती गाद्यांचे कडे असावे, प्रत्येक गोविंदाचे नाव, पत्ता, छायाचित्र, वयाचा दाखला पोलिसांकडे द्यावा, असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले होते. यातील काही बाबींची पूर्तता यंदाच्या दहीहंडीत होणे कठीण असल्याने पुढील वर्षी त्या लागू होतील, असेही न्यायालयाने बजावले होते.
दहीहंडीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलीस कायद्यात आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्देशही न्यायालयाने सरकारला दिला होता.
हे  नियम  पाळावेच  लागतील..
*६५ डेसिबल आवाजाची मर्यादा
*दहीहंडीच्या ठिकाणी रुग्णवाहिका अनिवार्य
*सहभागी गोविंदांना हेल्मेट सक्तीचे
*थराभोवती गाद्यांचे कडे असावे
*प्रत्येक गोविंदाचे नाव, पत्ता, छायाचित्र, वयाचा दाखला पोलिसांकडे द्यावा