काही दिवसांपूर्वी मुंबईत रशियन महिलेने बिझनेस क्लासमधील जागा मिळवण्यासाठी टॉपलेस होत केबिन क्रू सदस्यांना मारहाण केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा रशियन महिलेचा काहीसा असाच प्रकार समोर आला आहे. विमान हवेत असताना एका महिलेने भलतीच मागणी केली. मला सिगारेट ओढण्याची परवानगी द्या, असे सांगत तिने कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच सर्व प्रवासी मरणार आहेत, असे सांगून सर्वांना घाबरवून सोडलं. अँझेलिका (Anzhelika Moskvitina) असे या ४९ वर्षीय महिलेचे नाव आहे. या महिलेला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुरुष फ्लाईट अटेंडंटचाही तिने चावा घेतला. रशियामधील एरोफ्लॉट फ्लाईट या विमानात सदर प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
हे वाचा >> हॉलीवूडची सेक्स सिम्बॉल म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री Raquel Welch चं निधन
स्टॅव्ह्रोपोल ते मॉस्को पर्यंत प्रवास करणाऱ्या विमानात ३३ हजार फूट उंचीवर असताना हा सर्व प्रकार घडला. अँझेलिकाने स्वतःला टॉयलेटमध्ये बंद करुन घेतले होते. तिथे तिने सिगारेट पेटवण्याचा प्रयत्न केला. इतर प्रवाशांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर फ्लाईट अटेंडंटना याबाबत माहिती देण्यात आली. सदर महिलेला टॉयलेटमधून बाहेर काढल्यानंतर तर तिने कहरच केला. विमानात अनेक लहान मुलं, महिला-पुरुष असताना त्यांच्यासमोरच ही महिला टॉपलेस झाली आणि कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करु लागली.
एक सहप्रवाशाने सदर महिलेचा व्हिडिओ काढला आहे. या व्हिडिओत महिला मद्यधुंद असल्याचे दिसत आहे. फ्लाईट अटेंडंट तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाही अँझेलिका काहीही ऐकण्यास तयार नव्हती. तिला तिचे कपडे कुठे आहेत, हे विचारण्यात आले. स्वतःचे कपडे कुठे टाकले, हे देखील तिला आठवत नव्हतं. विमानातील कर्मचाऱ्यांनी तिला जागेवर बसून कपडे घालण्याची विनंती केली. पण काही केल्या ऐकत नसल्यामुळे फ्लाईट कॅप्टनच्या आदेशानंतर तिला प्लास्टिकमध्ये गुंडाळण्यात आलं.
यावेळी कॅप्टनने अँझेलिकाला विमानात लहान मुले आहेत, त्यांचा आदर करा, असे सांगतिले. यावर अँझेलिका म्हणाली, “मला लहान मुलं आवडतात. मला माहितीये आता विमान उतरल्यानंतर मी एकतर वेड्यांच्या रुग्णालयात जाईल किंवा मला तुरुंगात टाकले जाईल. पण तरिही मला एकदा कॉकपिटमध्ये जाऊद्या.” विमान कर्मचाऱ्यांनी तिची मागणी मुर्खपणाची असल्याचे सांगितले. तरिही अँझेलिका काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.
अखेर मॉस्कोच्या शेरेमेत्येवो या विमानतळावर विमान उतरल्यानंतर अँझेलिकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिची तपासणी केली. तसेच चावा घेतलेल्या विमान कर्मचाऱ्यावर देखील उपाचर करण्यात आले. या घटनेनंतर एरोफ्लॉट फ्लाईट कंपनीने सदर महिलेला काळ्या यादीत टाकून विमानात प्रवाशांसाठी एक आचारसंहिता किंवा नियमावली बनविण्यात यावी, अशी मागणी केली. ही नियमावली सर्व विमान प्रवाशांना लागू करावी, असेही एरोफ्लॉटने सांगितले. अँझेलिकावर आता फौजदारी कारवाई होणार आहे.
एअर इंडियाचे प्रकरण गाजले
काही महिन्यापूर्वी एअर इंडियाच्या विमानात देखील प्रवाशांनी गैरप्रकार केले होते. यापैकी शंकर मिश्रा प्रकरण चांगलेच गाजले. सहप्रवाशी वृद्ध महिलेवर दारूच्या नशेत लघुशंका केल्यामुळे दोन महिन्यानंतर शंकर मिश्राला अटक करण्यात आली. या प्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. मागच्या काही दिवसांत विमानात विचित्र अशा घटना घडत असताना विमानातील प्रवशांसाठी आचारसंहिता असावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच विमानात दिल्या जाणाऱ्या मद्यावर बंदी आणावी का? असाही विचार केला जात आहे.