जम्मू-काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या लान्स नाईक सुधाकर सिंह यांच्या वडिलांनी हे नृशंस हत्याकांड करणाऱ्या पाकिस्तानला सडेतोड जवाब द्या, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारताच्या हद्दीत घुसून पाकिस्तानी सैनिकांनी माझ्या मुलासह आणखी एका भारतीय जवानाची नृशंस हत्या केली आहे. पाकिस्तानच्या ह्य़ा भेकड कृत्याला भारताने त्यांना त्यांच्याच भाषेत सडेतोड व कायमची जरब बसेल, असा जवाब द्यावा. भारताने तशी कारवाई केल्यास तीच शहीद सुधाकर व हेमराज यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी इच्छा शहीद सुधाकर सिंह यांचे पिता सच्चिदानंद सिंह यांनी व्यक्त केली आहे.
शोकाकुल वातावरणात शहीद सुधाकर सिंह यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘हमारी इच्छा है की दुश्मन का डटकर मुकाबला करके उसको उसी की भाषा में जवाब देना चाहिए’ असे सिधी जिल्ह्य़ातील दडिया गावचे रहिवासी असलेल्या सच्चिदानंद सिंह यांनी ‘पीटीआय’ला सांगितले.
सुधाकर हा चार भावंडांत सर्वात लहान होता. तो म्हणजे आमचे सर्वस्वच होता. पुढील महिन्यात १५ फेब्रुवारीला तो गावीही येणार होता. मात्र आता सगळेच संपले आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
७ फेब्रुवारी, २००२ मध्ये सुधाकर सिंह लष्करी सेवेत दाखल झाला. त्यांच्यामागे मागे पत्नी आणि चार महिन्यांचा मुलगा भास्कर असा परिवार आहे.
जवानांच्या हत्याकांडांवर केंद्र सरकारने केलेल्या प्रतिक्रियेबाबत छेडले असता सच्चिदानंद म्हणाले की, सरकारला प्रत्येक बाबतीत आपल्यावरील जबाबदारीची जाणीव ठेवावी लागते, मात्र या वेळची स्थिती निश्चितपणे वेगळी आहे.
शेजारील राष्ट्र असूनही सदैव शत्रुत्वाने वागणाऱ्या पाकिस्तानला त्यांनी चोख उत्तर द्यायला हवे, अशी आमची इच्छा आहे.
सुधाकरचा चुलतभाऊ प्रेम सिंह याने या संबंधात बोलताना सांगितले की, सुधाकरचे निवृत्त सासरे हेही लष्करात होते. मात्र त्यांचा जावई या हत्याकांडात शहीद झालेला असतानाही त्यांच्या नातवाने लष्करातच जावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा