Kim Jong-un Supreme Leader of North Korea on Nuclear Attack : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग-उनने अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी दिली आहे. “दक्षिण कोरिया आणि त्यांचा मित्र अमेरिकेने मिळून प्योंगयांग प्रदेशावर हल्ला केला तर आमचं सैन्य कुठलाही संकोच न करता अण्वस्त्रांचा वापर करेल”, किम जोंग-उन म्हणाला. एकीकडे इस्र्याल-हमास, इस्रायल-लेबनॉनपाठोपाठ इस्रायल-इराण युद्ध पेटलं आहे. रशिया-युक्रेन संघर्ष देखील थांबलेला नाही. अशातच आता उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिल्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
उत्तर कोरियामधील सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार किम जोंग-उन म्हणाला, “आमच्या शत्रूने डीपीआरकेच्या (डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया) सार्वभौमत्वावर अतिक्रमण करण्यासाठी सशस्त्र दलांचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर डीपीआरके कुठलाही संकोच न बाळगता आण्विक हल्ला करेल. आण्विक शस्त्रांसह आमच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व विध्वंसकारी अस्त्रांचा वापर करू”.
किम जोंग-उन काय म्हणाला
उत्तर कोरियाची अधिकृत वृत्तसंस्था, कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने (KCNA) दिलेल्या वृत्तानुसार किम जोंगने बुधवारी लष्कराच्या स्पेशल ऑपरेशन्स फोर्स युनिटला भेट दिली. यावेळी तो म्हणाला, दक्षिण कोरियाने आपल्या सार्वभौमत्वावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर आपलं सैन्य पूर्ण ताकदीनिशी त्यांच्यावर तुटून पडेल. त्या युद्धात आम्ही अण्वस्त्रांसह सर्व विध्वंसक शस्त्रास्रांचा वापर करू.
वॉशिंग्टन-सोलच्या मैत्रीमुळे किम जोंग-उनचा थयथयाट
यावेळी किम जोंग उनने दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक-येओल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दक्षिण कोरियाच्या अमेरिकेशी दृढ होत असलेल्या संबंधांवरून उत्तर कोरियाच्या हुकूमशाहचा थयथयाट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. किम जोंग-उन म्हणाला, “सोल (दक्षिण कोरियाची राजधानी) व वॉशिंग्टन (अमेरिकेची राजधानी) मिळून पूर्व आशियातील सुरक्षा व शांतता नष्ट करत आहेत”.
हे ही वाचा >> 1968 Plane Crash : शहीद जवानाचा मृतदेह ५६ वर्षांनी मूळ गावी, आई-वडील, पत्नी व मुलांपैकी कोणीच उरलं नाही; गावावर शोककळा
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष काय म्हणाले होते?
गेल्या अनेक दशकांपासून उत्तर कोरिया व दक्षिण कोरियामध्ये संघर्ष चालू आहे. अलीकडेच दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये लष्कराच्या परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शत्रूचे तळ उद्ध्वस्त करू शकणाऱ्या क्षेपणास्रांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. यावेळी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक-येओल यांनी किम जोंग उनला इशारा दिला की त्यांनी अण्वस्त्रांचा वापर केला तर त्यांची राजवट संपुष्टात येईल.