लंडन : राजे चार्ल्स तिसरे यांना शनिवारी एका ऐतिहासिक समारंभात ब्रिटनचे नवे ‘सम्राट’ घोषित करण्यात आले. त्यानंतर राजे चार्ल्स यांनी आपली आई दिवंगत राणी एलिझाबेथ यांच्या प्रेरणेने काम करण्याचे अभिवचन दिले. प्राचीन परंपरा आणि राजकीय प्रतीकात्मकतेने युक्त असा हा राज्याभिषेक सोहळा इतिहासात प्रथमच दूरचित्रवाणीवरून प्रसारित करण्यात आला.
‘‘गॉड सेव्ह द किंग’’ या अॅक्सेशन कौन्सिलच्या कारकुनाने केलेल्या घोषणेला तेथे जमलेल्या नागरिकांनी प्रतिसाद देत ब्रिटनच्या नव्या राजाच्या नावावर शिक्कामोर्तब केले. अॅक्सेशन कौन्सिल नव्या सम्राटाच्या नावाची घोषणा करण्याची औपचारिक भूमिका अधिकृतरीत्या पार पाडते. या ‘अॅक्सेशन कौन्सिल’मध्ये पंतप्रधान, ज्येष्ठ आणि वरिष्ठ राजकारणी, ब्रिटनमधील चर्चचे धर्मगुरू, लंडनचे महापौर, मोठमोठे सरकारी अधिकारी आदींचा समावेश असतो.
‘अॅक्सेशन कौन्सिल’ने ब्रिटनच्या सम्राटपदी किंग चार्ल्स तिसरे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर त्यांनी भाषण केले. ‘‘जन्मभर प्रेम आणि नि:स्वार्थी सेवेचे उदाहरण असलेल्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूची घोषणा करण्याचे हे सर्वात दु:खदायक कर्तव्य..’’, अशा शब्दांत चार्ल्स यांनी भाषणाचा प्रारंभ केला. ‘‘माझ्या आईची कारकीर्द समर्पण आणि निष्ठा याबाबतीत अतुलनीय होती. आम्ही दु:खी आहोत, तरीही आईची निष्ठा आणि विश्वासू जीवनाबद्दल तिचे कृतज्ञ आहोत, अशा भावना किंग चार्ल्स तिसरे यांनी व्यक्त केल्या. किंग चार्ल्स म्हणाले, ‘‘या सर्व जबाबदाऱ्या स्वीकारताना मी घटनात्मक सरकार टिकवण्यासाठी, सर्व प्रदेशांतील शांतता, सौहार्द आणि समृद्धीसाठी प्रयत्नशील राहीन.’’
राणी एलिझाबेथ यांचे गुरुवारी निधन झाले. त्यानंतर शनिवारी लंडनमधील सेंट जेम्स पॅलेस येथे ब्रिटनचे नवे सम्राट म्हणून किंग चार्ल्स तिसरे यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात येऊन शपथविधी समारंभ झाला. आईच्या निधनानंतर ७३ वर्षीय किंग चार्ल्स तिसरे ब्रिटनच्या राजसिंहासनावर विराजमान झाले आहेत. किंग चार्ल्स यांच्याबरोबर त्यांची पत्नी राणी कॅमिला, त्यांचा मुलगा प्रिन्स विल्यम, नव्या पंतप्रधान लिझ ट्रस आदी उपस्थित होते. सर जॉन मेजर, टोनी ब्लेअर, गॉर्डन ब्राऊन, डेव्हिड कॅमरून, थेरेसा मे आणि बोरीस जॉन्सन हे माजी पंतप्रधान यांच्यासह विरोधी पक्षनेतेही या समारंभाला उपस्थित होते.
सर्व जबाबदाऱ्या स्वीकारताना मी घटनात्मक सरकार टिकवण्यासाठी आणि जगातील सर्व प्रदेशांतील शांतता, सौहार्द आणि समृद्धीसाठी प्रयत्नशील राहीन.
– किंग चार्ल्स तिसरे