दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी आयोजित केलेल्या जनता दरबारात उडालेला गोंधळ म्हणजे सरकारच्या अपरिपक्वतेचे दर्शन असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपालबाबतच्या आंदोलनातील माजी सहकारी किरण बेदी यांनी केली आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यांवर वा इमारतींच्या छतांवर अशा प्रकारे बैठका आयोजित करणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. २०११ मधील जनलोकपाल लढय़ात बेदी, केजरीवाल यांनी अण्णांसोबत आंदोलन केले होते. त्यानंतर केजरीवाल अण्णांच्या गटातून बाहेर पडले.
नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी चांगले प्रशासन जनसुनावणीचे आयोजन करते. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच सनदी अधिकारी लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी बैठका घेतात. मात्र त्यांचे योग्य तऱ्हेने नियोजन आणि वेळ नेमून काम केले जाते. त्या अशा रस्त्यावर किंवा कुठल्याही इमारतीच्या छपरांवर घेतल्या जात नाहीत, असे स्पष्ट करीत बेदी यांनी केजरीवाल यांच्या जनता दरबारावर टीका केली.
योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी वा अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये नागरिकांच्या प्रश्नांवर बैठकांचे आयोजन केले जाते, हे एक परिपक्व प्रशासनाचे लक्षण आहे. मात्र त्याचा अभाव सध्या दिल्लीत आयोजित केलेल्या जनता दरबारात दिसून आल्याचे बेदी यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील ‘आप’च्या सरकारने शनिवारी प्रथमच सचिवालयात आयोजित केलेल्या खुल्या जनता दरबाराकडे सर्वाचे लक्ष लागून होते, मात्र मोठय़ा प्रमाणात जमलेला जनसमुदाय आणि योग्य व्यवस्थापनाअभावी जनता दरबाराच्या ठिकाणी एकच गोंधळ निर्माण झाला. त्या गर्दीमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून मुख्यमंत्री केजरीवाल ताबडतोब जनता दरबारातून निघून गेले. दरम्यान, मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही जनता दरबारातून निघून गेलो नसतो तर मोठय़ा प्रमाणात चेंगराचेंगरी झाली असती, अशी कबुली दिली. तसेच पुढच्या वेळी योग्य पद्धतीने नियोजन करून कार्यक्रम करण्याचे आश्वासन दिले.

Story img Loader