दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षात स्थानिक नेतृत्वाची वानवा असल्याने माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासमवेत पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर तडक पक्षाच्या ११ अशोका रस्त्यावरील मुख्यालयात बेदी दाखल झाल्या. भाजप प्रवेशाची सर्वात मोठी प्रेरणा मोदींकडून मिळाल्याचे आवर्जून किरण बेदी यांनी सांगितले. त्यामुळे शहा व मोदी यांनी बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिल्याची चर्चा राजधानीत रंगली आहे.
बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनवणार का, हा प्रश्न राजकीय उत्तर देत अमित शहा यांनी टाळला असला, तरी दिल्लीला सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे सूचक विधान करून बेदी यांनी भाजपप्रवेशाचा इरादा स्पष्ट केला. बेदी भाजपकडून निवडणूक लढवतील, मात्र मुख्यमंत्री कोण असेल, याचा निर्णय संसदीय मंडळ घेते. विशेष म्हणजे भाजपच्या सर्व नेत्या-कार्यकर्त्यांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे, असे उत्तर अमित शहा यांनी दिले. पक्षाच्या मुख्यालयात किरण बेदी यांच्या भाजपप्रवेशाच्या छोटेखानी सोहळ्यास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीयमंत्री डॉ. हर्ष वर्धन, दिल्लीचे प्रभारी प्रभात झा, प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय उपस्थित होते. बेदी म्हणाल्या की, वैयक्तिक व प्रशासकीय जीवनातील ४० वर्षे मी देशासाठी दिली आहेत. यापुढेही मी समर्पित भावनेने देशासाठी काम करीत राहील. भाजपप्रवेशाची सर्वात मोठी प्रेरणा मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे सांगून बेदी यांनी दिल्ली भाजपच्या इतर नेत्यांनाही अप्रत्यक्षपणे इशारा दिला. आयपीएसच्या कारकीर्दीत एका कनिष्ठ अधिकाऱ्याला पोलीस आयुक्त बनवण्यात आल्याने विरोध नोंदवण्यासाठी सेवेचा राजीनामा दिल्याचे बेदी म्हणाल्या. दिल्लीचे नेतृत्व करून एक स्थिर सरकार स्थापणार असल्याचे बेदी यांनी म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. दिल्लीचे माजी प्रदेशाध्यक्ष विजय गोयल यांनी बेदींच्या नेतृत्वात भाजप निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. बेदी यांचा भाजपप्रवेश ‘व्हाया’ नरेंद्र मोदी झाला आहे. त्यामुळे बेदी यांनाच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानण्यात येत आहे, परंतु भाजपने अद्याप आपले पत्ते उघडले नाहीत. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी बेदी यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. केजरीवाल यांच्या विरोधात नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून बेदी यांना निवडणूक लढवण्यावर चर्चा सुरू असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. पडद्यामागून किरण बेदी मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार असल्याचा प्रचार केल्यास आम आदमी पक्षाचे मतदार आपोआपच भाजपकडे वळतील, ही रणनीती राबविण्यावर प्रदेश भाजपमध्ये सध्या बैठका सुरू आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा