पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांना पदावरुन हटवण्यात आलं आहे. मागील काही काळापासून बेदी आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री नारायणसामी यांच्यामध्ये सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर बेदी यांना हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. यासंदर्भात वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बेदी यांच्या जागी तेलंगणाचे राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांच्याकडे पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे.
Dr. Kiran Bedi removed as the Lieutenant Governor of Puducherry
आणखी वाचाDr. Tamilisai Soundararajan, Governor of Telangana, given additional charge as Lieutenant Governor of Puducherry pic.twitter.com/pSOoIgcCJK
— ANI (@ANI) February 16, 2021
काही दिवसांपूर्वीच म्हणजेच १० फेब्रुवारीला राज्याचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राष्ट्रपतींना बेदी यांच्यासंदर्भात पत्र पाठवलं होतं. त्या पत्राद्वारे बेदी यांना परत बोलवून घ्यावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती. किरण बेदींचा कारभार तुघलकी असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला होता. बेदी यांना पदावरुन हटवण्याआधीच पुदुच्चेरीमधील काँग्रेसचं सरकार अल्पमतात आल्याने बेदींना हटवण्यामागील नक्की कारण काय असावं यासंदर्भात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. २८ मे २०१६ रोजी बेदी यांची पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली होती.
काँग्रेस सरकार अल्पमतात
पुदुच्चेरीमधील काँग्रेसचं सरकार पडण्याच्या स्थितीवर येऊन ठेपलं आहे. पुदुच्चेरीमधल्या अजून एका आमदाराने राजीनामा दिल्यामुळे आता काँग्रेसचं सरकार अल्पमतात आलं असून विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपकडून अपेक्षेप्रमाणे फ्लोअर टेस्ट अर्थात बहुमत चाचणीची मागणी केली गेली आहे. विशेष म्हणजे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या पुदुच्चेरी दौऱ्याच्या आधीच अशा प्रकारे काँग्रेससमोर राजकीय पेच निर्माण झाल्यामुळे आता राहुल गांधींच्या दौऱ्यामध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. पुदुच्चेरीमध्ये काँग्रेस आणि द्रमुक यांच्या आघाडीचं सरकार आहे. आत्तापर्यंत सत्ताधारी पक्षाच्या ३ आमदारांनी राजीनामे दिले असून आता ए जॉन कुमार यांनी देखील विधानसभा अध्यक्ष व्ही. पी. सिवकोलुंथू यांच्याकडे सभागृह सदस्यपदाचा राजीनामा सोपवला आहे. याआधी ए. नामासिवायम आणि मल्लाडी कृष्ण राव हे दोन मंत्री आणि ई थीप्पैथन या आमदाराने राजीनामा दिला आहे. त्याशिवाय, एन. धनवेलू यांना पक्षविरोधी कारवायांमुळे अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे एकूण ३३ आमदारांच्या पुदुच्चेरी विधानसभेमध्ये आता काँग्रेस-द्रमुक आघाडीचे १४ तर भाजप-अद्रमुक आघाडीचे देखील १४ आमदार राहिले आहेत. सत्ताधारी आघाडीच्या १४ आमदारांमध्ये १० काँग्रेस, ३ द्रमुक आणि १ अपक्ष आमदाराचा समावेश आहे. तर दुसरीकडे भाजप-अद्रमुक आघाडीमध्ये ३ भाजप, ७ एनआर काँग्रेस आणि ४ अद्रमुकचे आमदार आहेत.
येत्या मे महिन्यामध्ये पुदुच्चेरीमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या राजीनाम्यांचा, त्यानंतर घडणाऱ्या राजकीय घडामोडींचा आणि या पार्श्वभूमीवर पुदुच्चेरीमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.