साजकारणात कधी कुणाचे नशीब फळफळणार, हे कुणालाही सांगता येत नाही. वर्षांनुवर्षे ११, अशोका रस्त्यावर टाचा झिजवणाऱ्या भाजप नेत्यांना काल-परवा पक्षात दाखल झालेल्या किरण बेदी यांच्यापुढे झुकावे लागणार आहे. दिल्लीसारख्या राज्यात राजकीय नेतृत्वाची पोकळी किती मोठी आहे, याचे हे उत्तम उदाहरण. कुणी काहीही म्हणोत, पण दिल्लीत प्रामाणिकपणाची तुलना होऊ लागली ती आम आदमी पक्षामुळेच. या प्रामाणिकपणाच्या चर्चेत एका नेत्याचे नाव सदैव घेतले जाते. त्या नेत्याची स्वतंत्र ओळख देण्याची गरजच नाही. ‘दोन बूँद जिंदगी की’, या एका वाक्यात या नेत्याचे जीवन सांगावे लागेल.
दिल्लीची हवा सदैव दूषित असते. या दूषित हवेचे ‘आरोग्य’ सुधारण्याचा प्रयत्न या नेत्याने केला होता. त्यांच्या प्रामाणिकपणाची शपथ घेताना अनेकांना मनापासून ‘हर्ष’ होत असे. संघ शाखेवर ‘निर्माणों के पावन युग में-हम चारित्र्य निर्माण ना भुले’ या गीतातल्या ओळींची पारायणे करणारा एक स्वयंसेवक भाजपमध्ये गेला. स्वयंसेवक नेता झाला. राजकारणात चारित्र्याचे मापदंड भिन्न असतात. त्यावर चर्चा नको. या नेत्याने भाजपमध्ये स्वतंत्र ठसा उमटवला. आरोग्यमंत्री असताना पोलिओ निर्मूलन करण्याचा वसा घेतला. अवघी दिल्ली पालथी घातली. आरोग्याविषयी अनेक गैरसमज असतात. त्यात भर घातली ती तथाकथित धर्मनिरपेक्षतेचे सोंग घेतलेल्या राजकीय नेत्यांनी. दिल्ली सरकारची पोलिओ निर्मूलन मोहीम म्हणजे अल्पसंख्याकांची ‘कौम’ संपवण्याचे षड्यंत्र असल्याचा प्रचार दिल्लीत सुरू झाला. दिल्लीकरांचे अफवा, गावगप्पा व गोलगप्प्यांवर प्रेम. त्यामुळे कौम संपवण्याची अफवा यशस्वी झाली. दिल्लीच्या अल्पसंख्याकबहुल भागात लहान मुलांना पोलिओ डोस पाजू नका, असा प्रचार अफवा पसरवणाऱ्यांनी केला. पोलिओ डोस घेणाऱ्या लहान मुलांना भविष्यात संतती होणार नाही, अशा थापा मारण्यापर्यंत या अफवाबहाद्दरांची मजल गेली. ‘बाबरी’मुळे अविश्वासाचे वातावरण होते. व्हायचा तोच परिणाम झाला. पोलिओ मोहिमेला प्रतिसाद मिळेनासा झाला. उत्तर प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या दिल्लीच्या भागात अल्पसंख्याक समुदायाच्या बैठका झाल्या. आपल्या ‘कौम’साठी संघटित व्हा, वगैरे घोषणा देऊन झाल्या. याचे वृत्त आरोग्यमंत्र्यांना कळले. त्यांनी यंत्रणा कामाला लावली. अल्पसंख्याक समुदायातील धर्ममरतडाना भेटले. त्यांना विज्ञानाचे महत्त्व पटवून सांगितले. कुणाही धर्माच्या बालकाला पोलिओ होऊ शकतो, त्यानंतर येणारे अपंगत्व, अपंगत्वातून येणाऱ्या अवलंबित्वाची कहाणी कथन केली. पोलिओविरोधात लढण्यासाठी आवश्यक ‘दोन बूँद’चे महत्त्व सांगितले. त्यावर वादविवाद झाले. त्याचे रूपांतर संवादात झाले. मनांचे प्रज्वलन झाले. एक आश्वासक वातावरण निर्माण झाले. परस्परांविषयी विश्वास निर्माण झाला. धर्म व विज्ञानाची सांगड घातली गेली. ‘दोन बूँद’ जात-धर्म-पंथाच्या भिंती पाडून लहानग्या बालकांच्या मुखात गेले. सक्षम-सबलीकरणाच्या दिशेने जाणाऱ्या भारताला ‘हर्ष’ झाला.
निवडणूक म्हटली की, असे किस्से-कहाण्या रंगतात. जुन्याजाणत्यांकडून या कहाण्या कळतात. ज्या मंत्र्याची ही कहाणी, ते ही म्हणतात – ही कहाणी नाही; जीवनकहाणी आहे. कारण माझे आयुष्य या दोन थेंबांच्या पलीकडे नाहीच! दिल्लीच्या निवडणुकीच्या निमित्ताने या आठवणी ताज्या झाल्या. या आठवणींना राजकारणात महत्त्व नाही. कारण, आता भाजप मुख्यालयात नव‘किरण’ उगवल्याने ‘हर्ष’ मावळला आहे.
चाटवाला
दो बूँद जिंदगी..
साजकारणात कधी कुणाचे नशीब फळफळणार, हे कुणालाही सांगता येत नाही. वर्षांनुवर्षे ११, अशोका रस्त्यावर टाचा झिजवणाऱ्या भाजप नेत्यांना काल-परवा पक्षात दाखल झालेल्या किरण बेदी यांच्यापुढे झुकावे लागणार
First published on: 21-01-2015 at 03:42 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran bedi to take over room of harsh vardhan at bjp