Election Commission on Electoral Bonds Data: गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असणाऱ्या निवडणूक रोख्यांचा तपशील अखेर निवडणूक आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर भारतीय स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाला दिली आणि आयोगाने आता ही माहिती जाहीर केली आहे. आयोगाने निवडणूक रोख्यांच्या सर्व व्यवहारांचे तपशील त्यांच्या संकेतस्थळावर शेअर केले आहेत. यामध्ये कोणी किती रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले आणि कोणत्या राजकीय पक्षाला किती रुपयांचे निवडणूक रोखे मिळाले, याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. परंतु, कोणत्या व्यक्तीने अथवा कंपनीने कोणत्या राजकीय पक्षाला किती निधी दिला, याची माहिती समोर येऊ शकली नाही. त्यामुळे यासंदर्भात महत्त्वाचा घटक असणारा निवडणूक रोख्यांचा विशेष क्रमांक जाहीर करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला नोटीस जारी केली आहे. त्यामुळे आता कोणी कोणत्या पक्षाला किती रुपयांचं दान दिलंय याबाबतची माहिती समोर येईल.
निवडणूक रोख्यांद्वारे राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी देणाऱ्या पहिल्या ३० कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्या अशा आहेत ज्यांच्यावर अलीकडच्या काळात केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली आहे. या कंपन्यांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), आयकर विभागाने (आयटी) धाडी टाकल्या होत्या, तसेच इतरही कारवाया केल्या होत्या. त्यामुळे केंद्र सरकारवर आरोप होत आहे की, केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवून केंद्रातल्या भाजपा सरकारने या कंपन्यांकडून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे उकळले आहेत. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून जितके व्यवहार झाले आहेत त्यापैकी ४६ टक्क्यांहून अधिक पैसे भाजपाला मिळाले आहेत.
कर्नाटकमधील प्रसिद्ध महिला उद्योजिका, बायोकॉन लिमिटेड कंपनीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक किरण मुजुमदार-शॉ यांनीदेखील राजकीय पक्षांना देणग्या दिल्या आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या तपशीलांमध्ये किरण मुजुमदार यांचंदेखील नाव आहे. किरण मुजुमदार यांनी सहा कोटी रुपयांचे २४ निवडणूक रोखे खरेदी केले होते. हे निवडणूक रोखे राजकीय पक्षांनी वटवले आहेत. हे पैसे नेमक्या कुठल्या पक्षाला मिळाले आहेत हे अद्याप समोर आलेलं नाही.
हे ही वाचा >> ज्या कंपन्यांवर ED, CBI, IT ची कारवाई, त्यांच्याकडूनच सर्वाधिक देणग्या! निवडणूक रोख्यांवर अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या…
दरम्यान, एका युजरने मुजुमदार यांनी खरेदी केलेल्या निवडणूक रोख्यांची माहिती एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. या युजरने मुजुमदार यांना प्रश्न विचारला की, “कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या एक महिना आधी तुम्ही पाच कोटी रुपयांची देणगी दिलीत?” त्यावर मुजुमदार म्हणाल्या, “तुमचं गणित चुकलं आहे, पुन्हा एकदा बेरीज करा”. त्यावर त्या युजरने चूक दुरुस्त करून म्हटलं आहे, “तुम्ही सहा कोटी रुपयांची देणगी दिलीत, तुम्हालाही देणगी मागितली होती का?” त्यावर किरण मुजुमदार म्हणाल्या, “सर्वच पक्षांना निधी हवा असतो.”