केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी गोमांस खाणाऱयांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला असतानाच, दुसरीकडे मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी आणि केद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी मी गोमांस खातो आणि ते खाण्यापासून मला कोणीही रोखू शकते का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांच्या परस्परविरोधी विधानांवरून गोमांसवर बंदी घालण्याबाबत सरकारमध्ये एकमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यावर गोमांस विक्री करण्यावर, ते बाळगण्यावर कायद्याने बंदी घालण्यात आली. तेव्हापासून हा विषय देशभरात चर्चिला जाऊ लागला. किरण रिजिजू म्हणाले, मी अरुणाचल प्रदेशमधून येतो आणि गोमांस खातो. ते खाण्यापासून कोणीही मला रोखू शकत नाही. आपण लोकशाही देशात राहतो. त्यामुळे प्रत्येकजण आपापले मत मांडत असतो. काही लोकांची विधाने इतरांना आवडत नाहीत. मात्र, आपल्याला प्रत्येकाच्या मताचा आणि तेथील लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे.
ते म्हणाले, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या हिंदूबहुल राज्यांना तेथील लोकांच्या भावना समजून कायदे करण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे आमच्या राज्यांमध्ये आमच्या येथील लोकांच्या भावनांचा आदर सरकारने केलाच पाहिजे. आपल्याकडे अनेक जाती, धर्म, परंपरा आहेत. पण प्रत्येकाने दुसऱयाच्या भावनांचा आदर केलाच पाहिजे. कोणावरही आपले विचार लादण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचे सांगत त्यांनी नक्वींवर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा