नवी दिल्ली : जनादेश दिल्याने सरकारला संसद चालवायची आहे आणि प्रत्येकाने देशाची सेवा करण्यासाठी ‘टीम इंडिया’च्या भावनेने काम केले पाहिजे. संसदेत दर्जेदार चर्चा व्हायला हवी. देशाला संसदेत अर्थपूर्ण चर्चा पहायची आहे, असे सांगत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी सर्व राजकीय पक्षांना सभागृह सुरळीत चालवण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले.

संसदीय कामकाज मंत्री म्हणून नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर रिजिजू म्हणाले की, सभागृह चालवण्यात सरकारला सर्व राजकीय पक्षांचा सहभाग आणि सहकार्य हवे आहे. सर्वांनी सकारात्मक भूमिका घेतल्यास संसद सुरळीत चालेल. देशातील जनतेने आम्हाला देशसेवा करण्याचा जनादेश दिला आहे आणि आम्ही आमचे कर्तव्य पार पाडू. ज्यांना विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश मिळाला आहे त्यांनी विधायक विरोधाची भूमिका बजावावी, असे ते म्हणाले.

हेही वाचा >>> सरपंच ते ओडिशाचे पहिले भाजपा मुख्यमंत्री; कोण आहेत मोहन चरण माझी?

ते म्हणाले, ‘‘देशाचे नेतृत्व पंतप्रधानांच्या हातात आहे. पण संसद सत्ताधारी पक्ष आणि विरोधक दोघेही वादातून आणि चर्चेतून चालवतात. काही मुद्द्यांवर आमचं एकमत नसलं तरी चर्चा व्हायला हवी. त्यामुळे आमचा सर्वसहमतीवर विश्वास आहे.’’

संसदेचे अधिवेशन २४ जूनपासून

१८व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून सुरू होणार असून त्यात नवनिर्वाचित संसद सदस्य शपथ दिली जाईल. अधिवेशनाच्या पहिल्या तीन दिवसांत नवनिर्वाचित सदस्य शपथ घेतील आणि सभागृहाच्या अध्यक्षांची निवड केली जाईल. अधिवेशनाचा समारोप ३ जुलै रोजी होणार आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील आणि नवीन सरकारच्या पुढील पाच वर्षांच्या कामाची रूपरेषा सादर करतील. २७ जून रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान मोदी संसदेत त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांची ओळख करून देणार असल्याचे समजते.