नवी दिल्ली : राजपूत राजा राणा सांगा यांच्याविरोधात समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील खासदार रामजी लाल सुमन यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून शुक्रवारी राज्यसभेत केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू व विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यामध्ये खडाजंगी झाली. सुमन यांच्या माफीच्या मागणीवरून भाजपच्या सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातल्याने सभागृह तहकूब करावे लागले.

राजा राणा सांगा यांच्यामुळे बाबर भारतात आला, राणा सांगा गद्दार होते, अशी टिप्पणी ‘सप’चे खासदार रामजी लाल सुमन यांनी २१ मार्च रोजी केली होती. त्यावरून गेले काही दिवस राजकीय रणकंदन माजले आहे. सुमन यांच्याविरोधात करणी सेना आक्रमक झाली असून त्यांनी सुमन यांच्याकडून माफीची मागणी केली आहे. काही समाजकंटकांनी आग्रामधील सुमन यांच्या घराची, संपत्तीची, कारची गुरुवारी तोडफोड केली. करणी सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असले तरी सुमन यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण शुक्रवारी आणखी चिघळले. संसदेमध्ये भाजपच्या सदस्यांनी सुमन यांनी माफी मागितली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली.

राज्यसभेत भाजपचे खासदार राधामोहन सिंह यांनी सुमन यांच्या आक्षेपार्ह टिप्पणीचा मुद्दा उपस्थित केला. जोपर्यंत काँग्रेस व सुमन माफी मागत नाहीत तोपर्यंत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे राधामोहन म्हणाले. सुमन यांचे विधान राज्यसभेच्या कामकाजातून काढून टाकले असले तरी, समाजमाध्यमांवरून या विधानाची चर्चा केली जात आहे. सुमन यांचे विधान निंदनीय आहे, असे किरेन रिजिजू म्हणाले. त्यानंतर भाजपच्या सदस्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी, राजपूत राजा राणा सांगा यांना राष्ट्रीय नायक म्हटले. त्यांच्याविरोधातील टिप्पणी अपमानजनक आहे. अशा संवेदनशील विषयावर बोलताना सदस्यांनी भान बाळगले पाहिजे, असे धनखड म्हणाले.

सुमन यांच्या घरात घुसून आंदोलकांनी तोडफोड केली. या आंदोलकांना कायदा हातात घेण्यास कोणी सांगितले? सुमन हे दलित असल्यामुळे त्यांना त्रास दिला जात आहे. अशा तऱ्हेने कोणी दलित नेत्याला त्रास देत असेल तर सहन केले जाणार नाही.

मल्लिकार्जून खरगेविरोधी पक्षनेते

सुमन दलित असल्यामुळे त्यांच्या घरावर हल्ला केला गेला असे म्हणणे चुकीचे आहे. हा जाती व धर्माचा मुद्दा नाही. खरगे जाणीवपूर्वक हा मुद्दा जातीचा करत आहेत. सुमन यांचे विधान निंदनीय आहे. काँग्रेसनेही सुमन यांच्या वक्तव्याचा निषेध करायला हवा.

किरेन रिजिजूकेंद्रीय संसदीय कामकाजमंत्री