Waqf Amendment Bill in Lok Sabha : वक्फ सुधारणा विधेयक आज (२ एप्रिल) लोकसभेत मांडलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी १२ वाजता या विधेयकावर सभागृहात चर्चा सुरू झाली. विरोधकांच्या इंडिया आघाडीने वक्फ सुधारणा विधेयकाला तीव्र विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक मंजूर होऊ द्यायचं नाही, असा चंगच विरोधकांनी बांधला आहे. दरम्यान, आज या विधेयकावर चर्चा सुरू केल्यानंतर अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी यावर भाष्य केलं.
किरेन रिजिजू म्हणाले, “आज आमच्या सरकारने हे विधेयक आणलं नसतं तर दिल्ली वक्फ बोर्डाने आपल्या संसदेच्या इमारतीवर आणि आसपासच्या जागेवर दावा करण्याची तयारी केली होती.”
संसद भवनासह अनेक मालमत्तांवर दिल्ली वक्फ बोर्डाने दावा केला होता : रिजिजू
अल्पसंख्याक व्यवहार मंत्री म्हणाले, “१९७० पासून दिल्लीत एक खटला चालू होता. दिल्लीतील सीजीओ कॉम्प्लेक्स (केंद्र सरकारी कर्मचारी संकुल), संसद भवनासह अनेक मालमत्तांवर दिल्ली वक्फ बोर्डाने दावा केला होता. ही आमची मालमत्ता आहे असं वक्फ बोर्डाचं म्हणणं होतं. न्यायालयात याप्रकरणी खटला चालू होता. तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने (यूपीए) वक्फने दावा केलेली सगळी जमीन डीनोटिफाय (जमिनीवरील अधिसूचना मागे घेणे) करून वक्फ बोर्डाला दिली होती.
काँग्रेसप्रणित यूपीएने दिल्लीतल्या १२३ इमारती आणि आसपासची जमीन वक्फला दिली : किरेन रिजिजू
रिजिजू म्हणाले, “यूपीए सरकारने तब्बल १२३ इमारती व आसपासची जमीन वक्फला दिली होती. आज आमच्या सरकारने हे विधेयक आणलं नसतं तर आपण जिथे बसलेलो आहोत ती संसदेची इमारत आणि या जमिनीवरही वक्फ बोर्ड दावा करत होतं. दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, वसंत विहार परिसरावरही वक्फने दावा केला होता. आत्ता देशात यूपीएचं सरकार असतं तर अशा कित्येक इमारती त्यांनी डीनोटिफाय करून वक्फला दिल्या असत्या. आधीच त्यांनी १२३ इमारती डीनोटीफाय केल्या आहेत. मी माझ्या मनात येईल तसं बोलत नाहीये. मी अधिकृत नोंदी सांगतोय.”
कुंभमधील मृतांची आकडेवारी लपवण्यासाठी वक्फ विधेयक आणलं : अखिलेश यादव
किरेन रिजिजू यांनी यूपीएवर हल्लाबोल केल्यानंतर समाजवादी पार्टीचे प्रमुख व खासदार अखिलेश यादव यांनी वक्फ विधेयकावरील चर्चेत सहभाग घेतला. ते म्हणाले, “महाकुंभ मेळ्यातील मृतांची संख्या लपवण्यासाठी वक्फ विधेयक आणलं आहे.”