भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी सध्या देशाची राजधानी नवी दिल्लीत आपला तळ ठोकला आहे. महाविकासआघाडी सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टप्रकरणी किरीट सोमय्या पाठपुरावा करताना दिसत आहे. आता त्यांनी थेट केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेत परब यांच्या रिसॉर्टवरील कारवाईबाबत चर्चा केली. या चर्चेत केंद्रीय मंत्री यादव यांनी अनिल परब यांच्या रिसॉर्टबाबत आश्वासन दिल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

किरीट सोमय्या म्हणाले, “३१ जानेवारीला अनिल परब यांनी ९० दिवसांमध्ये त्यांचा रिसॉर्ट पाडावा असा आदेश निघाला होता. ३ मे रोजी ९० दिवस संपले आहेत. आता केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मला आश्वासन दिलं आहे की आता रिसॉर्ट पाडण्याच्या दृष्टीने अंतिम आदेश दिला जाईल.”

“उद्धव ठाकरे यांनी खूप मोठा तमाशा केला”

जितेंद्र नवलानी यांनी केलेल्या आरोपांवरही किरीट सोमय्या यांनी उत्तर दिलं. “माझ्यावर जितेंद्र नवलानी यांनी नाही तर उद्धव ठाकरे यांनी आरोप केले होते. त्यांनी पंतप्रधानांवर, केंद्र सरकारवर, ईडीवर, ईडीच्या चार अधिकाऱ्यांवर आणि किरीट सोमय्यांवर आरोप केले होते. हे सगळे ब्लॅकमेलिंग करतात, पैसे जमवतात असे आरोप करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी खूप मोठा तमाशा केला,” असा आरोप सोमय्यांनी केला.

“उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर EOW चा अहवाल सार्वजनिक करा”

किरीट सोमय्या पुढे म्हणाले, “मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे तपास विभागाला (EOW) चौकशी करायला लावली. त्या चौकशी अहवालात काय सापडलं? उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर ईओडब्ल्यूचा अहवाल सार्वजनिक करावा. ते खोटारडे आणि डरपोक मुख्यमंत्री आहेत. ईओडब्ल्यूने अहवालात आरोपांमध्ये काहीच दम नाही असं लिहून दिलंय. तक्रारदार बदमाश आहेत असंही लिहून दिलंय.”

हेही वाचा : “आदित्य ठाकरे यांची ७ कोटी रुपयांची चोरी पकडली, काय कारवाई झाली?”, किरीट सोमय्यांचा सवाल

“यानंतर उद्धव ठाकरे यांनी माफिया कमिशनर संजय पांडे यांना आदेश दिले. त्यांनी क्राईम ब्राँचला सांगितलं. यानंतर एसआयटीने ४० दिवस काम केलं, अनेकांचे जबाब घेतले पण काहीच निघालं नाही. म्हणून आता उद्धव ठाकरे घाबरले आहेत. आता संजय पांडे यांनी भ्रष्टाचार विरोधी विभागाला चौकशी करण्यास सांगितलं,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

Story img Loader