नवी दिल्ली: माजी ग्रामीण विकासमंत्री हसन मुश्रीफ यांना आता सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) आर्थिक घोटाळय़ांचा हिशोब द्यावा लागेल. शेतकऱ्यांच्या पैशांतून घोटाळे करताना मुश्रीफांना धर्म का आठवला नाही, असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी केला.अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील आर्थिक घोटाळय़ाला मुश्रीफ जबाबदार असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. बुधवारी झालेल्या ‘ईडी’च्या कारवाईनंतर मुश्रीफ यांनी, विशिष्ट धर्माच्या नेत्यांविरोधात सुडबुद्धीने कारवाई केली जाते, असा आरोप मुश्रीफांनी केला. हा आरोप सोमय्या यांनी फेटाळला. बोगस कंपन्यांमधून १५० कोटी मुश्रीफांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यात जमा झाले, तेव्हा धर्म आठवला नाही का, असा प्रतिप्रश्न सोमय्या यांनी केला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मुश्रीफांना पाठीशी घातले. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना मुश्रीफांच्या विरोधात कारवाई का झाली नाही? हसन मुश्रीफ व तत्कालीन ग्रामीण विकास सचिव राजेशकुमार मीणा यांनी दिलेल्या १५०० कोटींच्या कंत्राटचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सोमय्या यांनी केली.
आणखी वाचा – ईडीची छापेमारी मोठे षडयंत्र; ‘त्या’ चित्रफितीसह हसन मुश्रीफ यांचा सोमय्या यांच्यावर निशाणा
२०२३-१४ मध्ये ‘रजत कन्झ्युमर प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीकडून मुश्रीफांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यात १३ कोटी ८५ लाख रुपये जमा झाले. ही कंपनी २००४ मध्ये बंद झाली होती. बंद पडलेल्या ‘माऊट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या नावे बँक खाते उघडून २४ कोटी ७५ लाख रुपये मिळवले. ‘नेक्स्टजेन कन्सल्टन्सी सव्र्हिसेस’ या कंपनीकडून १६ लाख ३५ लाख रुपये मुश्रीफांना मिळाले. बोगस कंपन्यांतून मुश्रीफांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा दावा सोमय्या यांनी केला.