दहावीच्या परीक्षा सुरू आहेत, या मुलांना आपल्यामुळे कोणताही त्रास होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी काही काळाची विश्रांती घेत मध्यरात्री मुंबईतलं आझाद मैदान गाठलं. शेतकऱ्यांच्या या मोर्च्यात ३८ वर्षांच्या लहाने दौडाही होत्या. दोन मुलींची आई असलेल्या लहानेंची एक मुलगी गावाकडच्या केंद्रात दहावीची परीक्षा देत आहे. खरं तर दहावीचं वर्ष जितकं विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे तितकंच ते त्यांच्या पालकांसाठीही असतं. पण तरीही या माऊलीला आपल्या बांधवाचे प्रश्न महत्त्वाचे वाटत आहेत, म्हणूनच आपल्या मुलींची जबाबदारी शेजाऱ्यांवर सोपावून हजारो शेतकरी महिलांसोबतही त्याही शेकडो किलोमीटरची पायपीट करत नाशिकहून मुंबईत आल्या.

कमी वयात लग्न, त्यातून नवरा मद्यपान करून मारझोड करायला लागल्यावर लहाने नवऱ्यापासून वेगळ्या राहू लागल्या. फक्त सातवी शिकलेल्या लहाने या स्वत: जमीन कसत असल्यानं शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहिती आहेत. त्यांच्या गावातील अनेक शेतकरी गेल्या कित्येक वर्षांपासून वनजमीनी कसत आहेत. या वन जमिनीचे हस्तांतरण व्हावे यासांरख्या अनेक मागणीसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून त्या लढत आहेत. आपलं आयुष्य यापुढे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी खर्ची घालावं यासाठी त्या धडपडत आहेत. लहाने यांच्या एका मुलीनं नुकतीच बारावीची परीक्षा दिली तर दुसरी दहावीची परीक्षा देत आहे.

बारावीची परीक्षा दिलेल्या एका मुलीनं या मोर्च्यासाठी सोबत येण्याचीही इच्छाही व्यक्त केली होती असंही त्या म्हणाल्या. ‘माझ्या दोन्ही मुली हुशार आहेत, मला दहावीपर्यंत शिकता आलं नाही पण माझ्या मुलींनी खूप शिकावं ही इच्छा माऊलीनं व्यक्त केली. गावातील शेजाऱ्यांवर आपल्या दोन्ही मुलींची जबाबदारी सोपावून त्या मुंबईत आल्या आहेत. आपण शिकलो नाही पण आपल्या मागण्यांसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होता कामा नये याची जाणीव आपल्याला असल्यानं पायाचे तुकडे पडले असतानाही हा प्रवास पूर्ण केला असंही त्या म्हणाल्या.
गेली कित्येक वर्षे आपण शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केली, त्यात सहभागी झालो पण, याला हवा तसा प्रतिसाद लाभला नाही. दखल घेतली नाही पण आज मुंबईकरांनी या आंदोलनाला प्रतिसाद दिला, मदत केली. मुंबईकर खरंच मोठ्या मनाचे आहेत हेही सांगायला त्या विसरल्या नाहीत.

प्रतीक्षा चौकेकर

pratiksha.choukekar@loksatta.com