Kisan mahapanchayat : “सूर्यफुलाची बियाणे किमान आधारभूत किंमतीत खरेदी करा”, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून शेतकरी नेते आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने त्यांनी महापंचायत आणि रास्ता रोकोचा निर्णय घेतला. त्यानुसार आज दिवसभर दिल्ली-चंदीगड- अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करण्यात आला. यामुळे दिल्लीत वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली होती. पोलिसांच्या प्रयत्नांनी वाहतूक वळवण्यात आली आहे. परंतु, तरीही अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान, शेतकरी नेते त्यांच्या दोन मागण्यांवर ठाम आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.
बजरंग पुनियाचाही पाठिंबा
महिला कुस्तीपटूंवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी पुकारलेल्या आंदोलनाला शेतकरी नेत्यांनी पाठिंबा दिला होता. जंतर मंतरवरील आंदोलनात स्वतः राकेश टिकैत उतरले होते. आता शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी बजरंग पुनिया याने पाठिंबा दर्शवला आहे. आम्हीही शेतकऱ्यांचीच मुले असल्याचे सांगून त्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन दिले.
कुरुक्षेत्रावर महापंचायत संपन्न
सोमवारी दुपारी कुरुक्षेत्र येथे शेतकऱ्यांनी महापंचायतीचं आयोजन केलं होतं. या महापंचायतीला हजर न राहण्याच्या नोटीसा हरियाणा पोलिसांनी काही शेतकरी नेत्यांना धाडल्या होत्या. तसंच, रोहतक येथेही केएमपी महामार्गावर शेतकऱ्यांनी महापंचायतीचं आयोजन केलं होतं. ब्रिजभुषण सिंह यांना अटक केली नाही तर, बुधवारी १४ जून रोजी हरियाणातील सर्व रस्ते आणि महामार्ग जाम करायचे असा निर्णय या महापंचायतीत घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या दोनच मागण्या
दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शेतकीर संघटनेचे नेते राकेश टीकैत म्हणाले की, “आमच्या दोनच मागण्या आहेत. अटक केलेल्या शेतकरी नेत्यांची सुटका करा आणि सूर्यफुलाची बियाणे किमान आधारभूत किंमतीत खरेदी करा. सरकारसोबत चर्चा करायला आम्ही तयार आहोत.”
महापंचायतीसाठी पंजाब आणि हरियाणातील शेतकरी त्यांचे ट्रॅक्टर घेऊन रस्त्यांवर उतरले होते. तसंच, हरियाणासह आजूबाजूच्या राज्यातील अनेक शेतकरी पिपली ग्रेन मार्केटमध्ये दाखल होत सूर्यफुलांची बियाणे किमान आधारभूत किंमतीत खरेदी केली जात नसल्याचा दावा त्यांनी केली. सूर्यफुल बियाणांची किमान आधारभूत किंमत ६ हजार ४०० रुपये आहे. परंतु, शेतकऱ्यांकडून ही पिके अवघ्या चार हजारात विकत घेतली जात आहेत.