किश्तवार येथील जातीय हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपाने ‘व्यथित’ झालेले जम्मू-काश्मीरचे गृहराज्यमंत्री सज्जाद कित्चलू यांनी सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आपल्या विरोधात करण्यात आलेले आरोप केवळ राजकीय लाभ मिळविण्याच्या हेतूने झाले असून त्यामुळे आपण कमालीचे दु:खी झालो असल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या शिफारशीनंतर राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी कित्चलू यांचा राजीनामा स्वीकारला.
या प्रकरणी आपण निर्दोष असल्याचा दावा करून स्वतंत्र चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये यासाठी राजीनामा देत असल्याची पुस्तीही कित्चलू यांनी जोडली. आपण काहीही चूक केलेली नाही, असाही दावा त्यांनी केला. कित्चलू हे किश्तवार विधानसभा मतदारसंघातून नॅशनल कॉन्फरन्सच्या तिकिटावर निवडून आले आहेत. कित्चलू यांचा राजीनामा तातडीने स्वीकारण्यात आल्याचे राजभवनच्या निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले.
किश्तवार येथील जातीय हिंसाचारात कित्चलू हे सहभागी असल्याचा आरोप करून त्यांना मंत्रिमंडळातून हटविण्यात यावे, अशी मागणी भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केली होती.
किश्तवारमधील हिंसाचाराबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी कित्चलू यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या शरसंधान केले होते. कित्चलू यांनी जेटली यांच्या या विधानास तीव्र आक्षेप घेत गोध्रा प्रकरणानंतर मोदी यांनी राजीनामा दिला होता काय, अशी विचारणा केली. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगड फेकू नयेत, असा सल्लाही त्यांनी जेटली यांना दिला.

Story img Loader