सर्वप्रथम १९८९ मध्ये बहुदा हेडगेवार जन्मशताब्दीनंतर लगेच श्रीराम जन्मभूमी आंदोलनासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे जनजागरण सुरू करण्यात आलं होतं. तसंच रामजन्मभूमीसाठी प्रत्येकाकडून एक प्रतिज्ञापत्र आणि एक रुपयाही जमा करण्यात आला होता. त्यानंतर श्रीराम असं कोरलेल्या वीटा अयोध्येत पाठवण्यात आल्या होते. त्यानंतर १९९० मध्ये गुजरातमधील सोमनाथमधून अयोध्येपर्यंत लालकृष्ण आडवाणी यांनी रथयात्रा काढली. त्यानंतर १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी कारसेवकाची भूमिका बजावली होती.
यासाठीचा घटनाक्रम असा की १९८६ मध्ये नवव्या लोकसभेच्या निवडणुका पार पडणार होत्या. त्यातच निवडणुकांपूर्वी फैजाबाद न्यायालयानं बाबरी मशिदीसंदर्भात असलेल्या वादग्रस्त जागेला असलेलं टाळं उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तत्कालिन काँग्रेस सरकारनं न्यायालयाच्या निर्णयानुसार ते टाळं उघडलं. परंतु त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय रद्दहबातल ठरवला. १९८९ मध्ये लालकृष्ण आडवाणी यांनी सोमनाथमधून तब्बल १० हजार किलोमीटरची रथयात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, ही रथयात्रा काढण्याचा निर्णय विचारपूर्वकच घेण्यात आला असल्याचं इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात लालकृष्ण आडवाणींच्या हवाल्यानं सांगण्यात आलं होतं. गुजरात, महाराष्ट्र, आध्र प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार अशा राज्यांमधून ही रथयात्रा अयोध्येला पोहोचली. परंतु बिहारमध्ये आडवाणींना अटक करण्याच आली.
आणखी वाचा- प्रभू रामचंद्रांसाठी बलिदान: साबरमती एक्स्प्रेसमधून बचावलेल्या कार सेवकांची गोष्ट
अयोध्येत कारसेवेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण सहभागी झाले होते. प्रेमशंकर दास यांनीदेखील कारसेवा करतानाचा आपला अनुभव मांडला होता. प्रेमशंकर दास त्यावेळी २१-२२ वर्षांचे होते आणि वादग्रस्त ढाचा पाडण्यासाठीच अयोध्येत आले होते, असं त्यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटलं होतं. “कोणही कोणत्याही प्रकारचे निर्देश दिले नव्हते किंवा कोणी काय करायचं हेदेखील सांगण्यात आलं नव्हतं. याचं श्रेय सर्वांचं आहे. तो वादग्रस्त ढांचा पाडण्याचं श्रेय केवळ कारसेवकांनाच आहे,” असंही त्यांनी सांगितलं होतं.
आणखी वाचा- राम मंदिराचा मुद्दा ते केंद्रात सत्ता, जाणून घ्या भाजपाचा प्रवास
दरम्यान, त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या राजेश प्रभू-साळगांवकर यांनीदेखील लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना आपला अनुभव सांगितला. “६ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता आम्ही श्रीराम जन्मभूमी जवळ पोहोचलो. बाबरी शेजारी एका इमारतीच्या गच्चीवर मंच बांधला होता. त्यावेळी जवळपास ५-६ लाख जण श्रीराम जन्मभूमी परिसरात होते. बाबरीचा ढांचा दिसेल अशा उंचवट्यावर आम्ही बसलो होतो. मंचावरून नेत्यांची आणि संतांची भाषणे सुरु झाली. तसंच या ठिकाणी आपली जागा न सोडण्याचे सक्त आदेश आम्हाला देण्यात आले होते. अडवणींचे, उमा भारतींचे, दलमियाजींचे आणि सिंघल यांचे याठिकाणी भाषण झाल्यानंतर रामनामाचा मंचावरून जप सुरू झाला,” असं त्यांनी बोलताना सांगितलं.
आणखी वाचा- अयोध्या-बाबरी वादामुळे कशी पेटली मुंबई?
“त्यानंतरच अचानक समोरून एक गलका ऐकू येऊ लागला. काही जण बाबरीच्या ढाचाच्या घुमतांवर चढून भगवा फडकवताना आम्हाला दिसले. परंतु त्यानंतर त्या ठिकाणी असलेले काही जण घोषणा देत पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागले. प्रत्येक गटनेत्यांने आपापल्या गटाला कसेबसे आवरून धरले होते. कारण दिलेल्या सूचनांचे पालन करणे हीच संघाची शिस्त आहे, असे ते प्रत्येकला समजावत होते. मात्र तरी काही जण निसटून पुढे गेले. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीनं घुमटावर घाव घातला. त्यानंतर काही पुजारी आणि साधू संत रामलल्लाच्या मूर्ती घेऊन बाहेर येताना दिसले. रामधून बदलून लोक “एक धक्का और दो” च्या घोषणा देऊ लागले होते. मूर्ती हलवून झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांच्या कालावधीतच पहिला घुमट कोसळला. तिकडे साध्वी ऋतांबरा ही अशाच स्वरूपाच्या घोषणा देत होत्या. या घटनेला आता अनेक वर्षे झाली आहेत. तसंच आता राम मंदिराच्या उभारणीचं कामही सुरू झालं आहे. दरम्यान आता एवढ्या वर्षांनी केवळ राम मंदिर दिमाखात उभं राहावं हिच इच्छा आहे,” असंही प्रभू-साळगांवकर बोलाताना सांगतात.