Mahua Moitra Profile : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपांवरुन चर्चेत आल्या आहेत. संसदेत त्यांचं आक्रमक रुप कायमच पाहण्यास मिळालं आहे. मात्र सध्या त्यांची चर्चा होते आहे ती अदाणींवर आरोप केले ते मोदींना बदनाम करण्यासाठी या बातमीमुळे. ही बातमीही समोर आली कारण दर्शन हिरानंदानी यांचं प्रतिज्ञापत्र समोर आलं आहे. त्यात महुआ मोईत्रा यांच्यावर विविध आरोप करण्यात आले आहेत. तसंच या प्रकरणावरुन भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्रही लिहिलं आहे. महुआ मोईत्रा या त्यांच्या आक्रमक भाषणांमुळे ओळखल्या जातात. महुआ यांची ओळख एक कुशल वक्त्या आणि उत्कृष्ट नेत्या म्हणून ओळखल्या जातात. राजकारणात येण्यापूर्वी त्या बँकर होत्या. आपण जाणून घेऊ त्यांच्या बाबत माहित नसलेली माहिती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महुआ मोईत्रांचा जन्म आसामचा

महुआ मोईत्रा यांचा जन्म आसामच्या कछार जिल्ह्यात झाला. त्यानंतर महुआ यांनी त्यांचं शिक्षण हे कोलकातामधून घेतलं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबाने अमेरिकेला पाठवलं होतं. १९९८ मध्ये त्यांनी अर्थशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये पदवी घेतली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदार संघातून महुआ मोईत्रा तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या राहिल्या आणि निवडूनही आल्या.

न्यूयॉर्क आणि लंडन या ठिकाणी काम

महुआ मोईत्रा यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर जे.पी. मॉर्गन या प्रतिष्ठित बँकिंग कंपनीत नोकरी केली. न्यूयॉर्क आणि लंडन या दोन्ही ठिकाणी त्यांनी काम केलं आणि आपलं कौशल्य दाखवत त्या चांगल्या पदावरही पोहचल्या. जे.पी. मॉर्गनमध्ये काम करणाऱ्या बँकरचा सरासरी पगार १.२१ लाख डॉलर्सपेक्षा जास्त आहे. भारतीय रुपयांमध्ये तो एक कोटींपेक्षा जास्त होतो. महुआ मोईत्रा अशाच पॅकेजवर काम करत होत्या. मात्र या कामात त्यांना समाधान वाटत नव्हतं. त्यामुळे त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला काँग्रेसमध्ये प्रवेश मग तृणमूलमध्ये

२००९ मध्ये महुआ मोईत्रांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र वर्षभरातच त्यांना या पक्षाची ध्येयं धोरणं पटली नाहीत. त्यामुळे २०१० मध्ये महुआ मोईत्रा तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या. ज्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दिचा आलेख उंचावला.

तृणमूल काँग्रेसने महुआ मोईत्रा यांना २०१६ मध्ये नादिया जिल्ह्यातील करीमपूर मतदारसंघातून तिकिट दिले. त्यानंतर त्या विधानसभेत आमदार झाला. तृणमूल काँग्रेसने त्यांचं कौशल्य ओळखलं. त्यानंतर त्यांना २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदारकीची उमेदवारी देण्यात आली. ही निवडणूक जिंकल्यानंतर त्या खासदार म्हणून संसदेत पोहचल्या. तिथे त्यांनी एक आक्रमक खासदार म्हणून आपली ओळख निर्माण केली.

महुआ मोईत्रांनी लार्स ब्रॉसन या डॅनिश फायनान्सरशी लग्न केलं. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. त्यामुळे या दोघांचा घटस्फोट झाला. महुआ या सध्या दिल्लीत एकट्याच राहतात. आता ज्या आरोपांच्या फैरी त्यांच्यावर झाडल्या जात आहेत त्यातून त्या कशा बाहेर पडणार? किंवा या आरोपांना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know about tmc mp mahua moitra profile who is she bjp mp nishikant dubey cash for question allegations scj