भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जम्मू आणि काश्मीर पोलीस विभागातील अधिकारी (एएसआय) बाबूराम यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करून सन्मानित केलं. एएसआय बाबूराम यांची पत्नी रीना रानी आणि मुलगा मानिक यांनी राष्ट्रपतींनी दिलेला सन्मान स्विकारला. एका चकमकीत बाबूराम यांनी स्वतः जखमी होऊनही तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तसेच मोठ्या धाडस आणि पराक्रमाच्या बळावर आपल्या सहकाऱ्यांना वाचवलं होतं.
एएसआय बाबूराम आपल्या सेवेत १४ दहशतवाद विरोधी चकमकींचा भाग होते. यात त्यांनी २८ दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. बाबूराम यांनी एसओजीमध्ये तैनात असताना २९ ऑगस्ट २०२० रोजी आपल्या अखेरच्या ऑपरेशनमध्ये ३ दहशतवाद्यांना ठार केलं. मात्र, यात त्यांना वीरमरण आलं. ते या ३ दहशतवाद्यांशी ९ तास लढत होते.
बाबूराम यांच्या अखेरच्या ऑपरेशनमध्ये नेमकं काय घडलं?
२९ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. यावेळी एएसआय बाबूराम आपल्या टीमसोबत पंथा चौकात महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर नजर ठेऊन होते. त्यावेळी एका स्कुटीवर ३ दहशतवादी आले. त्यांनी सीआरपीएफच्या जवानावर हल्ला केला. दहशतवादी सीआरपीएफ जवानाचे शस्त्र हिसकावून घेत होते. यानंतर दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला आणि जवळच्या वस्तीत पळाले.
यानंतर एएसआय बाबूराम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दहशतवाद्यांचा पाठलाग केला आणि एका घराला घेराव घातला. सुरुवातीला घरात अडकलेल्या माणसांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मोहिम राबवण्यात आली. दरम्यान, दहशतवाद्यांना समर्पण करण्यास सांगण्यात आलं. मात्र, दहशतवाद्यांनी बाबूराम यांच्यावर गोळीबार केला. यानंतरही बाबूराम मागे हटले नाही. त्यांनी लश्करचा कमांडर साकिब बशीरशी लढा केला आणि काही वेळातच दहशतवाद्यांचा कमांडर साकिब मारला गेला.
हेही वाचा : तबलावादक अनिंदो चटर्जी यांचाही पद्म पुरस्कार स्वीकारण्यास नकार, म्हणाले, “मी माफी मागत…”
या चकमकीत दहशतवाद्यांचा कमांडर साकिब बशीरसह इउमर तारिक आणि जुबेर अहमद हे दोन सहकारी देखील मारले गेले. मात्र, या कारवाई दरम्यान बाबूराम देखील जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यांचा जीव वाचवण्या अपयश आलं. बाबूराम यांचा जन्म पुंछ जिल्ह्यातील मेंढर भागातील धारना गावात १५ मे १९७२ रोजी झाला.