संयुक्त अरब अमिरातमध्ये (United Arab Emirates) आठवड्यातील कामाचे दिवस आणि सुट्टी याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार या ठिकाणी जगातील सर्वात कमी दिवस काम करायला लागेल अशा आठवड्याची घोषणा करण्यात आलीय. यूएईने कामाच्या आठवड्याचे दिवस साडेचार दिवस केलेत. त्यामुळे या ठिकाणच्या कामगारांना केवळ सोमवार ते गुरूवार पूर्ण दिवस काम करावं लागेल. तसेच शुक्रवारी अर्धा दिवस काम करून सुट्टी मिळणार आहे.
विशेष म्हणजे यूएईने इतर अरब देशांपेक्षा वेगळा निर्णय घेत साप्ताहिक सुट्टी शुक्रवार-शनिवार रद्द करून ती शनिवार-रविवार अशी केली आहे. यामुळे जागतिक पातळीशी स्पर्धा करण्यात आणि कामाचा समन्वय करण्यास मदत होईल, असं मत यूएई प्रशासनाने व्यक्त केलंय.
यूएईमध्ये कामाचे दिवस केवळ साडेचार दिवस
याआधी यूएईमध्ये देखील इतर अरब देशांप्रमाणे साप्ताहिक सुट्टी शुक्रवार आणि शनिवारी होती. मुस्लीम नागरिकांना शुक्रवारचा नमाज पठण करता यावं म्हणून या सुट्ट्यांचे दिवस तसे ठरवण्यात आले आहेत. मात्र, यूएईने व्यवसायिक नियोजनाचा विचार करून शुक्रवार-शनिवारची सुट्टी शनिवार-रविवार केलीय. तसेच नमाजसाठी शुक्रवारी दुपारपासून सुट्टी जाहीर केली. यामुळे यूएईमध्ये कामाचे दिवस केवळ साडेचार दिवस झालेत.
यूएई साप्ताहिक सुट्टी शुक्रवार-शनिवारी नसणारा पहिला आखाती देश
यूएई सरकारने जाहीर केलेला राष्ट्रीय कामाचा आठवडा सर्व सरकारी कार्यालयांना १ जानेवारीपासून बंधनकारक असणार आहे. या निर्णयासह यूएई साप्ताहिक सुट्टी शुक्रवार-शनिवारी नसणारा पहिला आखाती देश बनला आहे. या निर्णयाने यूएई इतर जगाच्या बरोबर आला आहे. नव्या निर्णयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सरकारी कार्यालयांची सुट्टी शुक्रवारी दुपारपासून सुरू होईल आणि रविवारपर्यंत सुट्टी असेल. शुक्रवारी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी मशिदीत नमाज होईल. हे वेळापत्रक वर्षभर असेच असेल.
यूएईला जागतिक बाजारात इतर देशांच्या सोबतीने काम करता यावं म्हणून हा निर्णय घेण्यात आला. जगभरात सर्वात कमी कामाचा आठवडा ५ दिवसांचा आहे. मात्र, यूएईने कामाचा आठवडा साडेचार दिवसांचा करत सर्वात कमी दिवसांचा कामाचा आठवडा असलेला देश म्हणून विक्रम केलाय.