भारतात पीएम विक्रेते/फेरीवाले आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत (PM SVANidhi Scheme) डिसेंबर २०२१ पर्यंत ३०.७५ लाख कर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ३०.७५ लाख विक्रेत्यांना ३,०९५ कोटी रुपयांचे व्यावसायिक कर्ज मिळणार आहे. यापैकी २७.०६ लाख कर्ज प्रकरणांचे २,७१४ कोटी रुपये वितरीत देखील करण्यात आले आहेत. कर्ज वितरीत झालेल्या २७.०६ लाख लाभार्थींपैकी ५९ टक्के पुरुष, तर ४१ टक्के महिला आहेत.
महाराष्ट्रात किती कर्ज मंजूर?
महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत महाराष्ट्रात एकूण २ लाख २२ हजार ७१४ कर्ज प्रकरणांमध्ये २२४ कोटी २४ लाख ८५ हजार २६० रुपये कर्ज मंजूर झाले. यापैकी १ लाख ८७ हजार ५०२ कर्ज प्रकरणांमधील १८८ कोटी २१ लाख ५० हजार २६३ रुपये वितरीत देखील झालेत. यात पुरुषांची संख्या १ लाख १४ हजार ७०६ आणि महिलांची संख्या ७२ हजार ७९१ इतकी आहे.
हेही वाचा : २ लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्यांची कर्जमाफी कधी? नवाब मलिक म्हणाले…
दरम्यान, या योजनेंतर्गत आलेल्या अर्जांपैकी एकूण ६ लाख ७५ हजार ४९८ प्रकरणं बँकेने नामंजूर केली आहेत. यात ७१ हजार १६४ प्रकरणांमध्ये विक्रेत्यांना कर्ज घेण्यात रस नव्हता, २ लाख ९० हजार २०९ प्रकरणांमध्ये विक्रेते कर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उपलब्ध झाले नाहीत. याशिवाय इतर कारणांनी ३ लाख १४ हजार १२५ प्रकरणांचे अर्ज परत करण्यात आले.