How Much NASA Could Pay Sunita Williams After 9 Months Space Stay: नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे जेमतेम आठ दिवसांसाठी बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहिमेसाठी, आंतरराष्ट्रीय आंतराळ केंद्र म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये (ISS) येथे गेले होते. परंतु, त्यांना अंतराळात जाऊन आता नऊ महिने उलटून गेले तरी ते अद्याप पृथ्वीवर परत आलेले नहीत. काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांना तिथेच थांबावं लागले आहे. दरम्यान सध्या विल्यम्स व विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्याचे प्रयत्न चालू असून पुढच्या आठवड्यात दोघेही पृथ्वीवर परततील. १९ मार्च पूर्वी स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानातून परत येण्याच्या तयारीत असतानाच दुसरीकडे ते परत आल्यानंतर त्यांना अंतराळात राहण्यासाठी किती पैसे मिळणार याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
यादरम्यान नासाचे निवृत्त अंतराळावीर कॅडी कोलमन (Cady Coleman) यांनी सांगितले की, अंतराळवीरांना ओव्हरटाईमसाठी कोणताही विशेष पगार दिला जात नाही. फेडरल कर्मचारी असल्याने त्यांनी अंतराळात घालवलेला वेळ हा त्यांनी पृथ्वीवर कामानिमित्त केलेल्या प्रवासाप्रमाणेच गृहित धरला जातो. अंतराळात असताना त्यांना त्यांचे नियमित वेतन मिळत राहते, ज्यामध्ये नासा त्यांचे अन्न आणि आयएसएसवरील राहण्याचा खर्च देते.
अंतराळवीरांना पगार सोडून फक्त इन्सीडेंटल्ससाठी मिळणारा दैनिक भत्ता दिला जातो. जो की दररोज अवघे ५ डॉलर (सुमारे ३४७ रुपये) इतका असतो, कोलमन यांनी वॉशिंग्टनियनशी बोलताना याबद्दल माहिती दिली आहे.
तुलना करायची झाल्यास २०१०-११ मध्ये १५९ दिवसांच्या मोहिमेकरिता कोलमन यांना ऐकूण ६३६ डॉलर (जवळपास ५५ हजार रुपये) जास्तीचे मिळाले होते. याच हिशोबाने विल्यम्स आणि विल्मोर यांनी २८७ दिवसांपेक्षा जास्त काळ अंतराळात घालवला आहे, त्यामुळे त्यांना प्रत्येकी अवघे ११४८ डॉलर्स (सुमारे एक लाख रुपये) जास्तीचा मोबदला मिळेल. नासाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, अंतराळवीर हे तांत्रिकदृष्ट्या अडकलेले नाहीत, ते आयएसएसवर सातत्याने काम करत आहेत.
सुनीता विल्यम्स यांना किती पैसे मिळू शकतात?
नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे जीएम-१५ (GS-15) वेतन श्रेणी अंतर्गत येतात. जनरल शेड्यूल (GS) प्रणाली अंतर्गत येणारे कर्मचारी हे सर्वात वरच्या लेव्हलचे कर्मचारी असतात. जीएम-१५सरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक मूळ वेतन १२५१३३ डॉलर ते १६२६७२ डॉलर (अंदाजे १.०८ कोटी रुपये ते १.४१ कोटी रुपये) याच्या दरम्यान मिळते.
त्यांना ९ महिने जास्त आयएसएसवर राहावे लागले त्यामुळ विल्यम्स आणि विल्मोर यांना ९३८५० डॉलर्स ते १२२००४ डॉलर (अंदाजे ८१ लाख रुपये ते १.०५ कोटी रुपये) पगार मिळेल.
यामध्ये ११४८ डॉलर इतके अतिरक्त पैसे इंसिडेन्टल पे म्हणून त्यांना मिळतील. त्यामुळे त्यांना या मोहिमेसाठी मिळणारी रक्कम ही वाढून ९४९९८ डॉलर ते १२३१५२ डॉलर (अंदाजे ८२ लाख रुपये ते १.०६ कोटी रुपये) इतकी असू शकते.
पृथ्वीवर येण्यासाठी मोहिम सुरू
सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्स या कंपनीने त्यांचं स्पेस क्राफ्ट क्रू-१० पाठवलं असून हे अवकाश यान आज दुपारी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये दाखल झालं. या अवकाश यानातून एकूण चार अंतराळवीर व इतर कर्मचारी ISS मध्ये गेले आहेत. क्रू-१० आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात दाखल होताच विल्यम्स व विल्मोर यांनी सर्व नव्या सहकाऱ्यांचं जोरदार स्वागत गेलं.
परतीचा प्रवास कधी सुरू करणार?
क्रू-१० वरील अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात काही वेळ संशोधन करतील. विल्यम्स व विल्मोर यांनी केलेलं संशोधन व माहिती ताब्यात घेतील. त्यानंतर १९ मार्च रोजी विल्यम्स व विल्मोर या दोघांना घेऊन परतीचा प्रवास सुरू करतील. शुक्रवारी (१४ मार्च) क्रू-१० ने फाल्कन-९ रॉकेटच्या माध्यमातून उड्डाण केलं होतं. १९ तारखेला आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र सोडल्यानंतर २१ ते २३ मार्चच्या दरम्यान सहा अंतराळवीर पृथ्वीवर परततील.