काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी त्यांनी चन्नी गरीबाचा मुलगा असल्याचं म्हटलं. मात्र, ‘गरीबाचा मुलगा’ असलेल्या चरणजीत सिंग चन्नी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रावरून ते किती गरीब आहेत हे स्पष्ट झालंय.
निवडणुकीत घोषित केलेल्या संपत्तीनुसार चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे ९ कोटी ४५ लाख रुपयांची संपत्ती आहे. विशेष म्हणजे २०१७ च्या तुलनेत २०२२ मध्ये चन्नी यांची संपत्ती कमी झालेली दिसली. २०१७ मध्ये चरणजीत सिंग यांच्याकडे १४ कोटी ५१ लाख रुपयांची संपत्ती होती.
चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे नेमकी काय संपत्ती?
- चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे २ कोटी ६२ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तसेच ६ कोटी ८२ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
- चन्नी यांच्याकडे १ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम, तर त्यांची पत्नी डॉ. कमलजीत कौर यांच्याकडे ५० हजार रुपये रोख रक्कम आहे.
- चन्नी यांच्या बँक खात्यात ७८ लाख ४९ हजार रुपये, तर पत्नीच्या बँक खात्यात १२ लाख ७६ हजार रुपये आहेत.
- चन्नी यांच्याकडे ३२ लाख ५७ हजार रुपयांची टोयोटो फॉर्च्युनर कार आहे.
- चन्नी यांच्या पत्नीकडे २ कार आहेत. एकीची किंमत १५ लाख ७८ हजार रुपये, तर दुसरीची किंमत ३० लाख २१ हजार रुपये आहे.
- याशिवाय दागिण्यांविषयी बोलायचं झालं तर चन्नी यांच्याकडे १० लाख रुपयांचे, तर पत्नीकडे ५४ लाख रुपयांचे दागिणे आहेत.
- २६ लाख ६७ हजार रुपये एका पेट्रोल पंपात गुंतवणूक.
- कृषी आणि बिगर कृषी अशा दोन्ही प्रकराची जमीन, अनेक बंगले.
हेही वाचा : सिद्धू की चन्नी? पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्यमंपत्रीपदाचा उमेदवार कोण? राहुल गांधींकडून ‘या’ नावाची घोषणा
चन्नी यांच्यावरील कर्ज किती?
चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे कोट्यावधींची संपत्ती असली तरी त्यांच्यावर किरकोळ कर्जही असल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे. चन्नी यांच्यावर ६३ लाख २९ हजार रुपयांचं कर्ज, तर पत्नीवर २५ लाख ६ हजार रुपयांचं कर्ज आहे.
राहुल गांधी काय म्हणाले होते?
राहुल गांधी म्हणाले, “पंजाबच्या जनतेने काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री चेहरा म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांना निवडलं आहे. मी याच्याशी सहमत आहे. आम्ही सर्व एकत्र मिळून अधिक चांगल्या आणि आनंदी पंजाबच्या निर्मितीसाठी प्रयत्न करू. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पंजाबचा निर्णय आहे, हा राहुल गांधीचा निर्णय नाही. मी पंजाबच्या जनतेला, आमच्या उमेदवारांना, कार्यकर्त्यांना, युवकांना, वर्किंग कमेटीच्या लोकांना विचारलं आणि पंजाबने जे सांगितलं तोच निर्णय मी तुम्हाला सांगत आहे.”
“माझ्या मतापेक्षा पंजाबच्या जनतेचं मत अधिक महत्त्वाचं”
“पंजाब हिंदुस्तानच्या लोकांची सुरक्षा ढाल आहे. या राज्याला आपला नेता स्वतः निवडायला हवा आणि माझं काम तुमचा आवाज ऐकणं आहे, समजून घेणं आहे. माझ्या मतापेक्षा पंजाबच्या जनतेचं मत अधिक महत्त्वाचं आहे. पंजाबच्या जनतेने त्यांना एका गरीब घरातील मुख्यमंत्री हवा असं सांगितलं, जो गरीबी, भूक, त्यांची भीती समजू शकेल. पंजाबला त्या व्यक्तीची गरज आहे,” असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
“निर्णय कठीण होता, मात्र पंजाबच्या जनतेने सोपा केला”
राहुल गांधी म्हणाले, “निर्णय कठीण होता. मात्र, पंजाबच्या जनतेने सोपा केला. पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचे काँग्रेस उमेदवार चरणजीत सिंग चन्नी आहेत. सर्व काँग्रेस पक्ष एकत्र येऊन पंजाबला बदलण्याच्या मोहिमेला पूर्ण करू.”
हेही वाचा : “देशात पंतप्रधान नाही तर राजा, ज्याच्या निर्णयावर लोकांनी काहीच….”; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
“काँग्रेस पक्षातील नेते हिरे आहेत. मी २००४ पासून राजकारणात आहे. राजकारणाबाबत थोडा अनुभव आणि थोडी समज माझ्यातही आहे. नेता १०-१५ दिवसात तयार होत नाही. एक खरा नेता टेलिव्हिजनवरील चर्चांमध्ये तयार होत नाही. राजकीय नेता अनेक वर्षे लढून, संघर्ष करून तयार होतो. काँग्रेसकडे अशा हिऱ्यांची काहीच कमतरता नाही,” असंही राहुल गांधी यांनी नमूद केलं.