know how tahawwur rana heald in nia custody : मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याला गुरूवारी अमेरिकेतून प्रत्यार्पनानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याला दिल्ली न्यायालयात हजर केले असता त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर दिल्लीतील एनआयएच्या मुख्यालयातील एक लहानशी खोली ही भारतातील आजवरच्या सर्वात हाय प्रोफाईल दहशतवादी हल्ल्याच्या तपासाचे केंद्र बनले आहे. ही खोली १४ बाय १४ फूट आकाराची कोठडू असून यावर २४ तास कॅमेरे आणि सुरक्षारक्षकांच्या मदतीने देखरेख ठेवली जात आहे.
दिल्लीतील सीजीओ काँम्प्लेक्स येथील एनआयए इमारतीच्या तळमजल्यावर ही कोठडी असून राणा याच्या आगमनानंतर या कोठडीला अभेद्य किल्ल्यामध्ये बदलण्यात आले आहे. अतिरिक्त दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान या कोठडीच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. तसेच येथे परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही, अगदी मीडिया कर्मचार्यांनाही देखील प्रवेश दिला जात नाही.
राणाच्या कोठडीमध्ये बहुस्तरीय डिजिटल सुरक्षा व्यवस्था बसवण्यात आली आहे. या भागाच्या प्रत्येक इंचाव कॅमेऱ्याच्या मदतीने नजर ठेवली जात आहे. तसेच फक्त १२ ठरवून दिलेल्या एएनआय अधिकाऱ्यांना आत जाण्याचा अधिकार आहे. कोठडीमध्ये एक बेड आणि बाथरूम अशा सुविधा देण्यात आल्या आहेत, जेणेकरून त्याच्या हालचाली मर्यादित ठेवता येतील. सर्व मूलभूत गरजा जसे की जेवण, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा या त्याला कोठडीच्या आतमध्येच पुरवल्या जातील.
कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली होणार चौकशी
राणा हा ६४ वर्षीय पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक असून गुरुवारी त्याचे अमेरिकेतून भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले आहे. त्याला विमानाने दिल्लीत आणण्यात आले. त्यानंतर काही तासांनंतर त्याला पटियाला हाऊस येथील विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयीन कक्षातून सर्व अनावश्यक कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले होते. विशेष एनआयए खंडपीठाचे अध्यक्ष न्यायाधीश चंदर जीत सिंग यांनी राणाला १८ दिवसांची कोठडी सुनावली. यावेळी एएनआयकडून २० दिवसांची कोठडी मागण्यात आली होती. दरम्यान एएनआयच्या मुख्यालयात राणा याची सखोल चौकशी केली जाणार आहे. तसेच त्याची ही चौकशी ड्युअल कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली केली जाईल.
विशेष न्यायाधीश चंदेर जित सिंग यांच्यासमोर ‘एनआयए’ने आपले म्हणणे मांडले. यावेळी दर २४ तासांनी राणाची वैद्याकीय तपासणी करावी आणि राणाला त्याच्या वकिलांना एक दिवसाआड भेटू द्यावे, असे निर्देश न्यायालयाने ‘एनआयए’ला दिले. ‘एनआयए’ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राणाला त्याच्या वकिलांना भेटता येईल.
मुंबईवरील हल्ल्याच्या कटाची पूर्ण व्याप्ती समोर यावी, यासाठी राणाची कोठडी गरजेची आहे. तसेच, १७ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचे पूर्ण चित्र उभे राहावे, यासाठी त्याला संबंधित सर्व ठिकाणी घेऊन जाणे गरजेचे आहे. कटाचा पूर्ण उलगडा व्हावा आणि त्याची सखोल चौकशी व्हावी, यासाठी त्याची दीर्घ काळ कोठडी गरजेची असल्याचे एनआयएने न्यायालयात नमूद केले. मुंबईवरील हल्ल्यात जे डावपेच वापरले, त्याचा वापर देशातील इतर शहरांत हल्ल्यासाठीही करण्याचे त्याचे नियोजन होते, असा आम्हाला संशय आहे,’ असेही एएनआयने कोर्टात सांगितले.