दिल्लीत डिसेंबर २०१२ मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेली निर्भया ही तिच्या मित्रासोबत सिनेमा पाहून घरी परतत होती. नवी दिल्ली येथील मुनीरकापासून द्वारका या ठिकाणी जाण्यासाठी या दोघांनी बस पकडली. या बसमध्ये बसल्यावर फक्त पाच ते सात प्रवासी असल्याचं या दोघांना लक्षात आलं. प्रवास सुरु झाल्यानंतर बसलेल्या इतरांनी निर्भयासोबत छेडछाड केली. यामध्ये तिच्या मित्राने हस्तक्षेप केला तेव्हा त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहारण करण्यात आली. यानंतर सहा आरोपींनी निर्भयावर सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तिचा अमानुषपणे लैंगिक छळही केला. यानंतर विविस्त्र अवस्थेत निर्भया आणि तिच्या मित्राला बसबाहेर फेकून देण्यात आलं.
आणखी वाचा- निर्भया प्रकरण: आत्तापर्यंत तीन वेळा टळली होती दोषींची फाशी
या सगळ्या प्रकारानंतर निर्भयाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिला पुढील उपचारांसाठी सिंगापूरलाही नेण्यात आलं. मात्र तिथेच २९ डिसेंबर २०१२ ला तिचा मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंह याने तिहार तुरुंगात २०१३ मध्ये आत्महत्या केली. ऑगस्ट २०१३ मध्ये अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. सप्टेंबर २०१३ मध्ये चार मुख्य आरोपींना १३ अपराधांसाठी फास्ट ट्रॅक न्यायालयाने दोषी ठरवलं. १३ सप्टेंबर २०१३ रोजी या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
आणखी वाचा- निर्भया प्रकरण: शेवटची इच्छा काय?; तुरुंग प्रशासनाच्या प्रश्नावर आरोपी म्हणाले…
यानंतर १३ मार्च २०१४ रोजी फाशीच्या शिक्षेविरोधात आरोपींनी केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायलयात सुनावणी झाली. दिल्ली उच्च न्यायालयानेही या चारही दोषींची फाशी कायम ठेवली. त्यानंतर हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टातही या चारही जणांची फाशी कायम ठेवण्यात आली. राष्ट्रपतींनीही या चारही जणांचा दयेचा अर्ज फेटाळला.