पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी नर्मदा नदी पात्रात उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळयाचे लोकार्पण केले. सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारतीय राजकारणातील योगदान लक्षात घेऊन या पुतळयाला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ असे नाव देण्यात आले आहे.
– ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.
– यापूर्वी अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ हा ९३ मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा होता.
– अवघ्या पाच वर्षात या स्मारकाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. ३१ ऑक्टोंबर २०१३ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनीच या स्मारकाचे भूमिपूजन केले होते.
– नर्मदा नदीतील सरदार सरोवर धरणात हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.
– सरदार पटेल भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. त्यामुळे हा पुतळा उभारण्यासाठी लोखंड गोळा करण्याची विशेष मोहिम राबवण्यात आली. शेतकऱ्यांकडून लोखंड गोळा करण्यात आले.
– जमा केलेले लोखंड वितळवून पुतळयाचा पाया रचण्यासाठी त्या लोखंडाचा वापर करण्यात आला.
– या भव्य पुतळयाच्या बांधणीसाठी २५ हजार टन लोखंड आणि ९० हजार टन सिमेंटचा वापर करण्यात आला.
– देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी इथे थ्री स्टार निवासाची व्यवस्था असून एकूण १२८ खोल्या बांधण्यात आल्या आहेत.
– या स्मारकाच्या उभारणीसाठी २,९८९ कोटी रुपये खर्च आला असून २,५०० कामगारांनी या प्रकल्पावर काम केले आहे.
– दरवर्षी या पुतळयामुळे १५ हजार नोकऱ्यांची निर्मिती होईल असा अंदाज आहे.