बांगलादेशमधील कुमिल्ला शहरात दुर्गा पूजेच्या ठिकाणी कथितपणे कुराण ठेवल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर हिंदू मंदिरांवर हल्ले सुरू झाले. बांगलादेशात अनेक ठिकाणी हिंसाचार उफाळला. यात हिंदूंना लक्ष्य करण्यात आलं आणि आतापर्यंत जवळपास ५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. यावरून बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना अनेक प्रश्न विचारले जात आहेत. तसेच हिंसाचार रोखण्यात आणि देशातील अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षेत अपयश आल्याचा ठपका ठेवत जोरदार टीका होतेय. दुसरीकडे बांगलादेशमधील माध्यमं या हिंसाचाराकडे कसं पाहतात आणि तेथील संपादकीयमध्ये नेमकी कोणती भूमिका घेतली जाते याचाच हा आढावा.

बांगलादेशमधील प्रमुख वृत्तपत्रांपैकी एक असलेल्या ‘ढाका ट्रिब्यून’नं हिंदूंवरील हिंसाचारावरून आपल्या संपादकीयमध्ये थेट सरकारवर हल्लाबोल केलाय. आता बांगलादेशमधील समाज धर्मनिरपेक्षा राहिला नाहीये का? आणि या देशात अल्पसंख्यांकांसाठी कोणतीही जागा शिल्लक नाही का? असे थेट सवाल सरकारला विचारण्यात आलेत. याशिवाय ‘द डेली स्टार’ आणि ‘द डेली ऑब्झर्व्हर’ या वृत्तपत्रांनी देखील संपादकीय लेखात सरकारला धारेवर धरलंय.

“अल्पसंख्यांकांसाठी देश शिल्लक राहिला नाही”

‘ढाका ट्रिब्यून’नं सोमवारी (१८ ऑक्टोबर) लिहिलेल्या संपादकीयचा मथळा “अल्पसंख्यांकांसाठी देश शिल्लक राहिला नाही” असंच ठेवलं. त्यात म्हटलं, “यंदा दुर्गा पुजेच्या काळात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली जाईल आणि हिंदू समाज या सणाच्या काळात सुरक्षित असेल, असं आम्ही मागील संपादकीयमध्ये लिहिलं होतं. मात्र, पुन्हा एकदा दुर्दैवानं आम्हाला अल्पसंख्यांकांसाठी देश शिल्लाक राहिला नाही असं लिहावं लागत आहे. आम्ही हे आशावादी नजरेने नाही, तर निराशेतून लिहत आहे. बांगलादेशात समाजविघात तत्वांनी हिंदूंवर हल्ला करून मोठा गुन्हा केलाय. काही ठिकाणी बुद्धांवरही हल्ले झालेत. यामुळे दुःख झालंय.”

“बांगलादेशमधील हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन या अल्पसंख्यांक समाजावरील हल्ल्यांनी देशाला कमकुवत केलं आहे. या हल्ल्यांनी आपल्या नागरिकांमध्ये विभागणी केलीय. तसेच समाजा-समाजात शत्रुत्व तयार केलंय. हे मागील अनेक वर्षांपासून सूरू आहे. ज्यांनी हे हल्ले केलेत, हिंसा भडकावली आहे त्यांना अटक करावी. कारण या हल्ल्यांमुळे देशातील अल्पसंख्यांक समाजाला त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी कारवाई केली पाहिजे. बांगलादेश प्रगती करत असून एक विकसनशील देश आहे, मात्र देशाची निर्मिती धर्मनिरपेक्षतेवर झालेली असताना अल्पसंख्यांकांना येथे जागा शिल्लक नसल्याचं दिसत आहे,” असं मत ढाका ट्रिब्यूनच्या संपादकीयमध्ये मांडण्यात आलंय.

“हिंदू भक्तांना दूर्गेला असा निरोप द्यायचा नव्हता”

बांगलादेशचं मोठं वृत्तपत्र असलेल्या ‘द डेली स्टार’ने आपल्या संपादकीयमध्ये लिहिलं, “देशात इस्लाम धर्माचा अपमान केल्याचा आरोप करून एका समाजाविरोधात सातत्याने हल्ले वाढत आहेत. मानवाधिकार संघटना एन. ओ. सलिश केंद्रानुसार मागील ९ वर्षात हिंदू समाजाविरोधात कमीत कमी ३ हजार ७१० हल्ले झालेत. हिंदूं कुटुंबांना त्यांच्या सर्वात मोठ्या सणाच्या काळात निर्घृणपणा आणि अत्याचाराचा सामना करावं लागणं आणि सुरक्षा न मिळणं प्रशासनाचं अपयश आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षता कायम ठेवण्यात अपयश आलं. कोणताही देश अल्पसंख्यांक समाजाला सुरक्षा द्यायला नकार देऊ शकतो?”

हेही वाचा : “इस्लाम हा आमच्या देशाचा धर्म नाही”; दुर्गापूजेतील हिंसाचारावर बांगलादेशी मंत्र्यांची प्रतिक्रिया!

इंग्रजी वृत्तपत्र ‘द डेली ऑब्झर्व्हर’ने ‘धार्मिक सद्भावना वाचवा’ या मथळ्याखाली संपादकीय लेख लिहिला आहे. त्यात जगभरात धार्मिक वैर वाढत जात असल्याबद्दल काळजी व्यक्त करण्यात आलीय. तसेच अल्पसंख्याक समाजाला बहुसंख्याक समाजाकडून धोका वाटत असल्याचंही नमूद करण्यात आलं. या लेखात कमकुवत राष्ट्रांमध्ये धार्मिक वैर वाढत असल्याचं निरिक्षण नोंदवत या हल्ल्यांमागील सूत्रधारांना शिक्षा देऊनच हा प्रकार थांबवता येईल असं मत व्यक्त करण्यात आलंय.

Story img Loader