दाऊदी बोहरा मुस्लिम समाजात लहान वयातच पुरुष आणि स्त्रियांचे जननांग कापण्याची प्रथा आजही रुढ आहे. या प्रथेमागे अनेक धार्मिक किंवा पारंपरिक, शास्त्रीय कारणे असली तरीही अशाप्रकारे शरीराचा भाग कापणे हे चुकीचे असल्याचे म्हणणारा एक मोठा वर्ग आहे. या प्रथेच्या विरोधात मोहिम राबविणारेही काही जण आहेत. या प्रथेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आपले मत नोंदवले आहे. स्त्रियांचे आयुष्य फक्त लग्न करण्यासाठी किंवा नवऱ्याच्या सुखासाठी नसते असे म्हणत सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. दाऊदी बोहरा मुस्लिम समाजाच्या अल्पवयीन मुलींबाबत केली जाणारी खतना ही अनिष्ट प्रथा बंद करण्याचा उल्लेख या याचिकेत आहे. आता ही प्रथा म्हणजे नेमके काय ते पाहूया.
– मुस्लिम समाजात ज्याप्रमाणे मुलांची सुंता म्हणजेच जननेंद्रियावरील त्वचा कापली जाते त्याचप्रमाणे दाऊदी बोहरा समाजातील मुलींमध्ये खतना केले जाते.
– मुलींमध्ये खतना करताना त्यांच्या जननांगाचा भाग कापला जातो.
– यामुळे मुलींना सेक्स करण्याची इच्छा होणार नाही असा समज या समाजात आहे. महिलांच्या लैंगिक भावनांना शिस्त लावण्यासाठी हा प्रकार केला जातो.
– मुलीं साधारण ७ वर्षाच्या झाल्यावर त्यांना समाजातीलच एका स्त्रीकडे नेले जाते. आणि त्यांना कोणतीही कल्पना न देता हा भाग कापला जातो.
– हे करताना मुलींना अतोनात वेदना होतात. अनेकदा मुली काही दिवसांसाठी आजारी पडतात.
– हा विषय अतिशय नाजूक असल्याने मुली, महिला या विषयावर विशेष बोलत नाहीत. त्यामुळे याच्या विरोधात आवाज उठवणे आणखीनच दूर.
– पण तरीही याच समाजातील काही स्त्रियांनी एकत्र येऊन याच्या विरोधात मोहिम सुरु केली आहे. सहीयो म्हणजेच मैत्रिणी असे या मोहीमेचे नाव असून आरेफा जोहरी ही तरुण पत्रकार या ही मोहीम राबवत आहे.