देशातील ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीला आता केवळ काही महिने शिल्लक आहेत. 2022 मध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये निवडणुका होत आहेत. या राज्यांपैकी सध्या पंजाब आणि उत्तर प्रदेश सर्वाधिक चर्चेत आहे. पंजाबमध्ये काँग्रेसमधील गटबाजीनंतर नुकताच मुख्यमंत्री बदल करण्यात आला. विशेष म्हणजे पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपली नाराजी वेळोवेळी बोलून दाखवली. यामुळे काँग्रेसच्या राजकीय भविष्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच एबीपी सीवोटरचा सर्व्हे समोर आलाय. यानुसार काँग्रेसला आगामी निवडणुकीत या वादाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सर्व्हेनुसार पंजाबमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधील गटबाजी आणि वादाचा फायदा आम आदमी पक्षाला (AAP) होताना दिसत आहे. त्यामुळे या सर्व्हेनुसार पंजाबमध्ये झाडू चालण्याची शक्यता आहे. आता लगेच पंजाबमध्ये निवडणुका झाल्यास सर्वाधिक ३६ टक्के मतदान आपला होईल, असा अंदाज या सर्वेक्षणात वर्तवण्यात आलाय. यानुसार काँग्रेसला या स्थितीत ३२ टक्के मतं तर अकाली दलाला २२ टक्के मतं मिळू शकतात.

कोणाला किती जागा मिळू शकतात?

सर्वेक्षणानुसार, आम आदमी पक्षाला ११७ पैकी ४९ ते ५५ जागा मिळू शकतात. काँग्रेसच्या संख्याबळात मोठी घट होईल. काँग्रेसला ३९ ते ४७ जागा मिळू शकतात. अकाली दलाला १७ ते २५ जागा मिळू शकतात. अशाप्रकारे आप पंजाबमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येऊ शकतो. मात्र, त्यानंतरही आपला एकहाती बहुमत मिळवणं शक्य नसल्याचं हा सर्व्हे सांगतोय. यंदा भाजपा स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहे, तरीही भाजपला प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. या सर्वेक्षणानुसार भाजपला केवळ एक जागा मिळू शकते.

मागील विधानसभा निवडणुकीत कोणाचं किती संख्याबळ?

पंजाबमध्ये मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या. अकाली दलाला १५ आणि ‘आप’ला २० जागा मिळाल्या होत्या.

सिद्धूच पंजाब प्रदेशाध्यक्ष राहतील आणि निवडणुकीचं नेतृत्व करतील, सल्लागाराचं मोठं विधान

कोणत्या राज्यात काय राजकीय स्थिती?

उत्तराखंडबाबत बोलायचं झालं तर नव्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात भाजपाची पकड मजबूत दिसत आहे. भाजपला उत्तराखंडमध्ये पुन्हा सत्ता मिळू शकते. उत्तर प्रदेशमध्ये देखील भाजपाला बहुमत मिळेल असा अंदाज सर्वेक्षणात वर्तवण्यात आलाय. मणिपूरमध्ये देखील भाजपा पुन्हा सत्तेत येण्याचा जनमत कल दिसतोय. विशेष म्हणजे मागील पंचवार्षिकच्या तुलनेत यंदा जागांमध्ये वाढ होऊ शकते. मागील वेळी गोव्यात भाजपाला युतीचं सरकार स्थापन करावं लागलं होतं. मात्र, यंदा बहुमत मिळू शकतं असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know which party will win in panjab assembly election according to abp c voter survey pbs