रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी केली जाणार आहे. राम मंदिराचं उद्घाटनही याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे. अशात विरोधी पक्षाकडून राजकारण केलं जातं आहे. तसंच चारही शंकराचार्यांनी या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं जाहीर केलं आहे. जगन्नाथ पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी याबाबत ANI या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले स्वामी निश्चलानंद?
शंकराचार्य हे पद आपली प्रतिष्ठा बाळगून आहे. असं असलं तरीही आम्हाला अहंकार आहे म्हणून आम्ही रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्याचं टाळलेलं नाही. आमच्याकडून काय अपेक्षित आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतील तेव्हा आम्ही बाहेर बसून टाळ्या वाजवायच्या आहेत का? असा प्रश्न स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी विचारला आहे.
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात चारही शंकाराचार्य येणार नसल्याने विरोधी पक्षांच्या हाती मुद्दाच मिळाला आहे. यावरुन आता आरोप आणि प्रत्यारोप सुरु झाले आहेत. चारही शंकराचार्य हे कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत असं सांगितलं जातं आहे. काँग्रेसने याच मुद्द्यासह राम मंदिराचं काम अर्धवट राहिलं आहे तरीही राजकीय हेतूने मंदिर सुरु केलं जातं आहे आणि घाईने राम लल्लाची प्रतिष्ठापना केली जाते आहे असाही आरोप केला आहे. दुसरीकडे २२ जानेवारी या दिवशी चारही शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण होईल. देशभरातून हजारो लोकांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. कारसेवक आणि त्यांचे कुटुंबीय, हजारो साधू-संत, सेलिब्रिटी, क्रीडापटू आणि महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण गेले आहे. असे असले तरी भारतातील चार मठांच्या (पीठ) चार शंकराचार्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. त्याची कारणे त्यांच्याकडून देण्यात आली आहेत अशात आता स्वामी निश्चलानंद यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.