मुस्लिम धर्मियांचा महत्त्वाचा मानला जाणारा मोहरम सण सध्या साजरा होतो. आज हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. इस्लामनुसार, मोहरम म्हणजे वर्षारंभ. मोहम्मद पैगंबर यांच्या मृत्यूनंतर काही वाद सुरू झाले होते. मोहम्मद यांचा चुलत भाऊ आणि जावई, अली हा त्याचा उत्तराधिकारी होता. त्यानंतर घडलेल्या घटनांबद्दल शोक व्यक्त करण्याकरता शिया बांधव आजही मातम साजरा करतात. आजच्या दिवशी सामुहीक पद्धतीने शोक व्यक्त केला जातो. त्यावेळी हुसेन व इतर शियांना जखमा झाल्याच्या प्रित्यर्थ आजचे शियाही स्वतःला जखमा करून घेतात. तलवारीने स्वतःवर वार करतात. धारदार लोखंडी साखळ्यांनी स्वतःला मारून घेतात. हा दिवस सणाचा नाही तर दु:खाचा आहे. पाण्याचे वाटप करणे हा ही एक फार महत्त्वाचा प्रकार असतो.
सांगली जिल्ह्यातील कडेगाव इथे ताबुताची प्रथा सुरु झाली. मोहरम निमित्त या गावी २५० फूट उंचीचे बांबू पासून (कळक) ताबूत बनवले जातात. अष्टकोनी आकाराचे व पहिल्यांदा कळस आणि मग पाया या पद्धतीने हे ताबूत उभारले जातात व त्याची मिरवणूक काढली जाते. इराकची राजधानी बगदादपासून १०० किमी अंतरावर उत्तर-पूर्व दिशेला करबला हे एक छोटसे गाव आहे. येथे तारीख-ए-इस्लामचे एक ऐतिहासिक युध्द झाले. त्याने इस्लाम धर्माचा चेहरामोहराच बदलून टाकला. या करबला गावामुळेच जगातील प्रत्येक शहरात ‘करबला’ नावाचे पवित्र स्थान उभारण्यात आले आहे व या ठिकाणी मोहरम साजरा केला जातो.