जगातला सर्वात मौल्यवान आणि प्रसिद्ध हिरा म्हणजे कोहिनूर. हा कोहिनूर हिरा ब्रिटिश राजघराण्याकडे आहे. विजयाचं प्रतीक म्हणून हा हिरा टॉवर ऑफ लंडनमध्ये ठेवला जाणार आहे. या वर्षी मे महिन्यात तो सामान्यांना पाहता येईल. गेल्या अनेक वर्षांपासून ब्रिटिश राजघराण्याकडे हा हिरा आहे. या वर्षी मे महिन्यात ब्रिटनचे किंग चार्ल्स ३ यांचा राज्याभिषेक होणार आहे. त्यावेळी त्यांची पत्नी कॅमिला कोहिनूर हिऱ्याने जडलेला मुकुट घालणार आहे.
ब्रिटनच्या चॅरिटी हिस्टॉरिक रॉयल पॅलेसेजने काय म्हटलं आहे?
ब्रिटनच्या महालाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या चॅरिटी हिस्टॉरिक रॉयल पॅलेसेज(HRP) यांचं म्हणणं आहे की न्यू ज्वेल हाऊसच्या प्रदर्शनात कोहिनूरचा इतिहास सांगितला जाईल. कोहिनूर हा हिरा दिवंगत राणी एलिझाबेथ II यांच्या आईच्या मुकुटात लावण्यात आला होता. हाच मुकुट राणी एलिझाबेथ द्वितीय यांनीही घातला होता. आता हा टॉवर ऑफ लंडनमध्ये ठेवण्यात येणार आहे.
एचआरपीने दिलेल्या माहितीनुसार राणी एलिझाबेथ द्वितीय यांची आईशी या हिऱ्याचा जो इतिहास आहे तो सांगितला जाणार आहे. व्हिज्युअल प्रोजेक्शन आणि इतर माध्यमांच्या आधारे हा इतिहास सांगितला जाईल. कोहिनूर हिरा हा मुघल साम्राज्यातून इराणच्या शाहकडे कसा आला? अफगाणिस्तानातून तो ब्रिटनमध्ये कसा पोहचला ही सगळी माहिती दिली जाणार आहे.
कोहिनूरचा फारसी भाषेत अर्थ काय?
कोहिनूरचा फारसी भाषेतला अर्थ आहे माऊंटन ऑफ लाइट. महाराज रणजीत सिंह यांच्याकडे असलेला हा हिरा राणी व्हिक्टोरियाकडे कसा आला? ब्रिटिश शासन काळात या हिऱ्याने कशी महत्त्वाची भूमिका बजावली याचा इतिहास रंजक आहे. टॉवर ऑफ लंडनमध्ये हा मुकुट ठेवण्यात येईल. त्यानंतर मे महिन्यात कोहिनूर हिरा असलेला मुकुट सगळ्यांना पाहता येणार आहे. आपण जाणून घेऊ भारतातून हा हिरा ब्रिटनमध्ये कसा आला?
काय आहे कोहिनूरचा इतिहास?
कोहिनूर हा जगातला सर्वात अमूल्य मानला जाणारा हिरा आहे. १४ व्या शतकात आंध्र प्रदेशातल्या गोवळकोंडा या ठिकाणी असलेल्या एका खाणीत हा हिरा आढळून आला. त्यावेळी या हिऱ्याचं वजन ७९३ कॅरेट होतं. अनेक वर्षे हा हिरा जगातला सर्वात मोठा हिरा म्हणून ओळखला जात होता.
मात्र काळाच्या ओघात हा हिरा कापण्यातही आला. त्यामुळे हा हिरा हळूहळू छोटा झाला. एका रिपोर्टमधल्या माहितीनुसार १५२६ ला जे पानिपतचं युद्ध झालं त्यावेळी ग्वाल्हेरचे महाराज विक्रमजीत सिंह यांनी आपली सगळी संपत्ती आगरा येथील किल्ल्यात वळवली होती. बाबर ही लढाई जिंकला. त्यानंतर बाबरने हा किल्लाही ताब्यात घेतला आणि हा हिरा त्याच्या कब्जात गेला. त्यावेळी त्याचं वजन १८६ कॅरेट होतं.
१७३८ नादिर शाहने मुघलांवर हल्ला केला. त्यावेळी कोहिनूर हिरा त्याने स्वतःच्या ताब्यात घेतला. नादिर शाहनेच या हिऱ्याला कोहिनूर असं नाव दिलं. नादिर शाह हा हिरा इराणला घेऊन आला. १७४७ मध्ये नादिर शाह याची हत्या करण्यात आली. त्यानंतर हा हिरा त्याचा नातू शाहरूख मिर्झाकडे पोहचला. शाहरुख मिर्झाने हा हिरा त्याचा सेनापती अहमद शाह अब्दालीला दिला. अब्दाली हा हिरा घेऊन अफगाणिस्तानात गेला. अब्दालीचा वंशज शुजा शाह हा जेव्हा लाहोरला आला तेव्हा त्याच्यासोबतही हा हिरा लाहोरला आला. याबाबत पंजाबचे महाराज रणजीत सिंह यांना कळलं. त्यावेळी शुजाकडून १८१३ मध्ये त्यांनी हा हिरा परत मिळवला.
ब्रिटिशांकडे हा हिरा नेमका कसा आला?
महाराज रणजीत सिंह यांच्या मुकुटात कोहिनूर हिरा होता. १८३९ मध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतर हा मुकुट त्यांचा मुलगा दलीप सिंह यांच्याकडे आला. १८४९ मध्ये ब्रिटनने महाराज दलीप यांना हरवलं. त्यानंतर २९ मार्च १८४९ ला लाहोरच्या किल्ल्यात एक तह झाला. त्यावेळी दलीप सिंह हे अवघे दहा वर्षांचे होते. दहा वर्षांच्या दलीप सिंह यांची सही तहावर घेण्यात आली. ज्यामध्ये हे लिहिण्यात आलं होतं की कोहिनूर हिरा हा ब्रिटनच्या महाराणीला दिला जावा. त्यामुळे अशा पद्धतीने तो हिरा ब्रिटिशांकडे गेला. १८५० मध्ये लॉर्ड डलहौसी हे कोहिनूर हिरा आधी लाहोरहून मुंबईत घेऊन आले. तिथून तो हिरा लंडनमध्ये पोहचला.
३ जुलै १८५० ला कोहिनूर हिरा ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरिया यांच्यासमोर सादर करण्यात आला. हा हिरा त्यावेळी पुन्हा कापण्यात आला. हा हिरा महाराणी व्हिक्टोरियाच्या मुकुटात जडवण्यात आला त्यावेळी या हिऱ्याचं वजन होतं १०८.९३ कॅरेट. सध्याच्या घडीला या हिऱ्याचं वजन १०५.६ कॅरेट आहे.