मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या लीना नायर यांची फ्रान्समधील लक्झरी फॅशन ब्रँड ‘शनेल’च्या जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नियुक्ती करण्यात आली आहे. युनिलिव्हरमध्ये सर्वात कमी वयाच्या मुख्य मनुष्यबळ अधिकारी होत्या. नुकताच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला असून जानेवारीमध्ये त्या शनेलची धुरा सांभाळणार आहेत.
लीना नायर यांचा जन्म कोल्हापुरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातील होली क्रॉस शाळेत झाले. सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळवली. त्यानंतर जमशेदपूरच्या एक्सएलआरआय महाविद्यालयातून त्यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण
केले.
ग्लोबल कंज्युमर गुड्स कंपनीत त्यांनी काही वर्षे काम केल्यानंतर त्या २०१३मध्ये लंडन येथे स्थायिक झाल्या. २०१६मध्ये त्यांनी युनिलिव्हरमध्ये मुख्य मनुष्यबळ अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली. आता शनेल या आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँडची धुरा त्या सांभाळणार आहेत.
‘माझा सन्मान’
शनेल या प्रतिष्ठित कंपनीच्या जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती होणे हा माझा सन्मान असून हे पद मी नम्रतापूर्वक स्वीकारते आहे, अशा शब्दांत लीना नायर यांनी आनंद व्यक्त केला.
पुन्हा भारतीयांचा डंका
काही दिवसांपूर्वी मूळचे भारतीय वंशाचे असलेल्या पराग अगरवाल यांची ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली. त्यानंतर पुन्हा भारतीयाच्या गळ्यात जागतिक कंपनीच्या सीईओ पदाची माळ आली आहे. गूगलच्या अल्फाबेट कंपनीत सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टमध्ये सत्या नाडेला, आयबीएममध्ये अरविंद कृष्णा, अॅडोबमध्ये शंतनू नारायण आदी भारतीयांची उच्च अधिकारीपदावर नियुक्ती झाली आहे.