कोलकातामधील सॉल्ट लेक परिसरात रविवारी रात्री एका २६ वर्षीय तरुणीवर चालत्या गाडीत सामूहिक बलात्कार करुन तिला नंतर गाडीतून जखमी अवस्थेत फेकून देण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी मोठी मोहिम सुरु केली आहे. ही तरूणी मुळची नेपाळची असून ती गेल्या तीन वर्षांपासून या परिसरात राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरूणीने रात्री ११ वाजता कॉफी शॉपमध्ये जाण्यासाठी घराजवळून उबेर टॅक्सी पकडली. मात्र, टॅक्सीने तिला चुकीच्या ठिकाणी नेऊन सोडले. सेक्टर व्ही येथे ही तरूणी टॅक्सीतून उतरली. यावेळी तरूणीने त्याठिकाणी उभ्या असलेल्या एका तरूणाला रस्ता विचारला. त्याने तिला मदत करायची तयारी दर्शविली. परंतु, त्याने चुकीची माहिती दिल्याचे या तरुणीने सांगितले. या तरुणीने रस्त्यावर चालण्यास सुरुवात करताच या तरूणाने फोन करुन अन्य काहीजणांना बोलावून घेतले. काहीच मिनिटांत हा तरूण आपल्या अन्य मित्रांसह गाडी घेऊन आला. यानंतर कॉफी शॉपमध्ये सोडण्याच्या निमित्ताने त्यांनी तरूणीला गाडीत बसवून घेतले. मात्र, गाडीत बसल्यावर त्यांनी या तरूणीला कॉफी शॉपमध्ये न सोडता गाडी अन्यत्र वळविली आणि चौघाजणांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे पोलिसांनी सांगितले. तीन वाजता या तरूणीला सॉल्ट लेक परिसरात गाडीतून ढकलून देण्यात आले. यानंतर तेथील एका टॅक्सी ड्रायव्हरच्या मदतीने ही तरूणी पोलिस ठाण्यात गेली आणि तिने तक्रार दाखल केली.

Story img Loader