सामाजिक जीवनातील पेहेराव कसा असावा? याबाबत काही नियमावली असावी की नाही? या मुद्द्यांवरून वेळोवेळी खल होत असतो. काही दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोमध्ये एका तरुणीने घातलेल्या कपड्यांवरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. “माझे कपडे हा माझा अधिकार आहे”, असं म्हणत या तरुणीने तिच्या पेहेरावाचं समर्थन केलं होतं. आता कोलकात्यातील एका महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जासोबतच त्यांना पेहेरावासंदर्भात लिहून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पेहेरावाची चर्चा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
कोलकात्यातील आचार्य जगदीशचंद्र बोस महाविद्यालयाकडून हा नियम जारी करण्यात आला आहे. प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेश अर्जाबरोबरच हे लेखी आश्वासन विद्यार्थ्यांनी लिहून देण्याचे निर्देश महाविद्यालयाने दिले आहेत.
काय लिहून द्यायचंय विद्यार्थ्यांनी?
महाविद्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, “पहिल्या सत्राच्या नव्या प्रवेशाची प्रक्रिया ७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. महाविद्यालयाच्या आवारात फाटक्या जीन्स घालण्यास सक्त मनाई असेल. फक्त फॉर्मल ड्रेस घालण्यास परवानगी असेल”, असं नमूद करण्यात आलं आहे.
“उर्फी जावेदला टक्कर देण्याचा विचार आहे का ?”, रिप्ड जीन्समुळे उर्वशी रौतेला ट्रोल
विद्यार्थ्यांसाठी प्रतिज्ञापत्र!
दरम्यान, प्रवेशावेळी विद्यार्थ्यांनी सही करण्यासाठीचं एक प्रतिज्ञापत्रही महाविद्यालयाकडून देण्यात आलं आहे. “आचार्य जगदीशचंद्र बोस महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर मी कधीही महाविद्यालयाच्या आवारात फाटलेली किंवा तशी डिझाईन केलेली जीन्स घालणार नाही. आक्षेपार्ह कपडे परिधान करणार नाही. महाविद्यालयाच्या आवारात मी नियमानुसार परवानगी असणाराच पेहेराव करीन”, असं प्रतिज्ञापत्र विद्यार्थ्यांनी सही करून प्रवेश अर्जाबरोबर जोडणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
प्राचार्यांचं समर्थन
दरम्यान, महाविद्यालयाच्या या निर्णयाचं प्राचार्यांनी समर्थन केलं आहे. “गेल्या वर्षीही आम्ही अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना काढल्या होत्या. पण तरीही, काही विद्यार्थी महाविद्यालयात फाटक्या जीन्स घालून येत असल्याचं दिसून आलं होतं. आमच्या विद्यार्थ्यांनी अशा पेहेरावात महाविद्यालयात यावं अशी आमची इच्छा नाही. मी त्याची परवानगी देणार नाही. त्यामुळेच यावर्षी आम्ही नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. महाविद्यालयाच्या बाहेर त्यांनी त्यांना हवे तसे कपडे घालावेत”, असं या महाविद्यालयाच्या प्राचार्य पूर्णा चंद्रा मैती यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं.
लाखमोलाच्या ‘फाटक्या’ कपड्यांची ‘फॅशन’, या अभिनेत्रींची हटके स्टाईल पाहाच….
विद्यार्थ्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचं काय?
दरम्यान, असे निर्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या निवडीबाबतच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला ठरत नाहीत का? अशी विचारणा केली असता त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. “महाविद्यालयाच्या बाहेर त्यांना ते स्वातंत्र्य नक्कीच असेल. पण एकदा ते महाविद्यालयाच्या आवारात आले, की मग त्यांना शिस्त व नियमांचं पालन करावं लागेल”, असंही मैती यांनी स्पष्ट केलं.