Mamata Banerjee : कोलकाता येथील आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील एका निवासी डॉक्टर महिलेवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतील आरोपी संजय रॉय (Sanjoy Roy) याला पोलिसांनी अटक केली. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये ममता बॅनर्जी यांनी बलात्कारांच्या घटनांच्या विरोधात कठोर कायदा करण्याची मागणी केली आहे. तसेच देशभरात दररोज सुमारे ९० बलात्काराच्या घटना नोंदवल्या जात आहेत. अशा प्रकराच्या घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी सुनावणी १५ दिवसांत पूर्ण व्हायला हवी, असं ममता बॅनर्जींनी म्हटलं पत्रात म्हटलं आहे.
"I wish to bring your kind attention the regular and increasing occurrence of rape cases throughout the country and in many cases, rapes with murder are committed," reads a letter by West Bengal CM Mamata Banerjee (@MamataOfficial) to PM Modi.
— Press Trust of India (@PTI_News) August 22, 2024
"Such serious and sensitive issue… pic.twitter.com/a7jADUrosm
ममता बॅनर्जींनी पत्रात काय म्हटलं?
ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं की, “मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की, देशभरात बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, अनेक प्रकरणांमध्ये बलात्कार आणि त्यानंतर निर्घृण हत्येच्या घटना समोर येत आहेत. देशभरात दररोज सुमारे ९० बलात्काराच्या घटना नोंदवल्या जात आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे राष्ट्राचा आत्मविश्वास डगमगतो. महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी हे थांबवणं हेच सर्वांचं कर्तव्य आहे. अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपीला कठोर शिक्षा करण्याची गरज आहे. त्यामुळे केंद्रीय कायद्याद्वारे अशा संवेदनशील मुद्द्यावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अशा घटनांमध्ये लवकरात लवकर सुनावणी होण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यासाठी विशेष न्यायालये देखील स्थापन करण्याचा विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये न्याय लवकर मिळेल. याबरोबरच अशा प्रकरणांची सुनावणी १५ दिवसांत पूर्ण व्हायला हवी”, असं ममता बॅनर्जी यांनी पत्रात म्हटलं आहे.
कोलकातामधील घटना काय?
कोलकाता येथील आर.जी कर महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. या घटनेचा देशभरातून निषेध केला जात आहे. या घटनेवरुन देशभरातील डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. या घटनेमध्ये अनेक नवे पैलू रोज समोर येत आहेत. आता आरोपी संजय रॉयबाबत अनेक धक्कादायक माहितीही समोर आली. या प्रकरणात पोलिसांनी संजय रॉयला अटक केलेली आहे.